मोहोळ – शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मुदत संपली तरी ते सुरू करण्यात प्रशासनाने चालढकल केली .त्यामुळे तालुक्यातील हजारो मका उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. स्थानिक बाजारात मक्याचा भाव हा १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल असा व्यापारी देत असून शासकीय हमीभाव हा २४०० रुपये प्रति क्विंटल आहे.
यामुळे मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर जिल्हा भारतीय किसान संघाच्या वतीने देण्यात आला .या आशयाचे निवेदन सोलापूर जिल्हा भारतीय किसान संघाच्या वतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आले .
या निवेदनानुसार आणि दिलेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका वगळता इतर सर्व तालुक्यात मका खरेदी केंद्र सुरू झाले आहेत मात्र जिल्ह्यात सर्वाधिक मका उत्पादन करणारा मोहोळ हा तालुका असताना या तालुक्यात महाराष्ट्र शासनाचे आदेश व निर्देश डावलून हे खरेदी केंद्र आजपर्यंत सुरू झाले नाही . विशेष म्हणजे मका उत्पादक शेतकऱ्यांनी या केंद्रावर नाव नोंदणी करण्याची मुदत आज म्हणजे बुधवारी दि . ३१ डिसेंबर रोजी संपणार होती तथापि मोहोळ तालुक्यात हे खरेदी केंद्र नसल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड अडचण झाली.
यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी भारतीय किसान संघाचे जिल्हा मंत्री आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य एडवोकेट मनोज व्यवहारे यांच्याकडे धाव घेतली त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आणि बुधवारी किसान संघाचे प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट रावसाहेब शहाणे पाटील जिल्हा अध्यक्ष नागपा सिंदगी आणि जिल्हा मंत्री एडवोकेट मनोज व्यवहारे यांनी हे निवेदन दिले आणि ३१ डिसेंबर रोजी संपलेले मुदत २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढवावी अन्यथा नाईलाजाने हायवे वर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .
यामुळे चालढकल करून शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांवरकाय कारवाई होणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे .


























