बिलोली / नांदेड – गाढवांच्या खुरांची योग्य निगा व व्यवस्थापन हे त्याच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण खुर हे संपूर्ण शरीराचे वजन पेलणारे मजबूत आधारस्तंभ असतात. खुरांची वेळोवेळी सफाई न झाल्यास किंवा नियमित छाटणी न केल्यास गाढवांना चालण्यात वेदना, असंतुलन तसेच गंभीर पायाच्या समस्या उद्भवू शकतात. या पार्श्वभूमीवर सगरोळी (ता. बिलोली) येथील ‘धर्मा डॉंकी सेंचुअरी’ संस्थेतर्फे गाढवांच्या खुरांची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी परीसातील १० अश्वमित्रांची निवड करून विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गत आठवड्यात घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात खुर व्यवस्थापनाचे सविस्तर मार्गदर्शन तसेच प्रत्येक अश्वमित्रास खुरसफाई किटचे वाटप करण्यात आले.
नियमित खुरसफाईमुळे खुरांचा नैसर्गिक आकार टिकून राहतो, तडे जाणे, सडणे, फोड होणे व काच-खिळे टोचण्याच्या घटना टाळल्या जातात. स्वच्छ व नीट छाटलेले खुर असल्यास गाढव सहज, स्थिर व संतुलितपणे चालू शकते, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता वाढते. याशिवाय खुराखालील चिखल, दगड व जंतू काढल्याने संक्रमण, सूज व जखमा टाळता येतात.
दररोज स्वच्छता आणि दर ६ ते ८ आठवड्यांनी खुर छाटणी करणे हा उत्तम निगेचा भाग मानला जातो. या उपक्रमात सुगाव (ता. देगलूर), आळंदी, बोरगावथडी, आरळी, कोल्हेबोरगाव, गळेगाव व बामणी (ता. बिलोली), सुजलेगाव, कोकलेगाव (ता. नायगाव) येथील अश्वमित्रांनी सहभाग नोंदवला. येथील सैनिकी विद्यालयाच्या अश्वशाळेतील प्रशिक्षक प्रकाश ढोणे यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी ‘धर्मा डॉंकी सेंचुअरी’ संस्थेचे विश्वस्त अभिजीत महाजन यांनी, या प्रशिक्षणामुळे गाढवांच्या खुरांची निगा अधिक प्रभावीपणे राखली जाईल असा विश्वास व्यक्त केला, तर कृषी विज्ञान केंद्रातील पशुवैद्यक डॉ. निहाल मुल्ला यांनीही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.



















