नांदेड – तालुक्यात पंतप्रधान आवास योजना, मोदी आवास आणि रमाई आवास योजनेंतर्गत लाभधारकांच्या घरकुल हप्त्यांच्या रक्कमेचे वितरण मागील तीन ते चार महिन्यांपासून थांबले आहे हि रक्कम त्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा नाही केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गट विकास अधिकारी कंधार यांना शिवसेना तालुका कंधारच्या वतीने एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील नागरिकांनी अनेक वेळा पंचायत समिती कार्यालयात येऊन विनंत्या केल्या, थेट अधिकाऱ्यांना भेटून तसेच दूरध्वनीवरही संपर्क साधूनही डिएसी बंद असल्याचे किंवा बजेट उपलब्ध नसल्याचे कारण देत काम पुढे ढकलले जात आहे. नांदेड जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये घरकुल हप्त्यांची रक्कम नियमित वितरित होत असताना केवळ कंधार तालुक्यातच डिएसी बंद असल्याने हजारो लाभधारक अडचणीत आहेत, अशी टीका निवेदनात करण्यात आली आहे.
शिवसेनेने गटविकास अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा आरोप करताना कॉन्ट्रॅक्ट बेसवरील जे.ई. आणि कॉम्प्युटर ऑपरेटर यांच्या संगनमताने बिले काढण्यासाठी लाभधारकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. शिवसेनेने १५ डिसेंबर २०२५ पर्यंत डिएसी सुरु करून सर्व योजनेतील लाभधारकांच्या खात्यावर रक्कम जमा न झाल्यास पंचायत समिती कार्यालयात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषद मुख्याधिकारी, प्रकल्प संचालक, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
निवेदनावर तालुकाप्रमुख परमेश्वर पाटील जाधव आणि तालुका संघटक पंडित देवकांबळे अच्युतराव मेटकर आदींची स्वाक्षरी आहे. कंधार तालुक्यातील लाभधारकांच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी सध्या जोर धरत असून प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

















