सोलापूर – गेल्या महिनाभरापासून प्रेक्षकांच्या उत्सुकतेच्या केंद्रस्थानी असलेला ‘तू माझा किनारा’ हा मराठी चित्रपट आता अखेर प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची प्रदर्शन तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ अशी जाहीर करण्यात आली आहे. वडील आणि मुलीच्या नात्याचा भावस्पर्शी प्रवास दाखवणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
‘तू माझा किनारा’ ही कथा आहे प्रत्येक वडिलांची, ज्यांना आपल्या मुलीबद्दल खूप सांगायचं असतं पण शब्द सापडत नाहीत आणि प्रत्येक मुलीची, जी आपल्या बाबांना समजून घ्यायचा प्रयत्न करत राहते.ही कथा आहे एका अशा कुटुंबाची, जे प्रेम, संघर्ष आणि समजुतीच्या दरम्यान स्वतःचा “किनारा” शोधतं. हा सिनेमा केवळ बाप लेकिच्या नात्याची कथा नाही, तर प्रत्येक घरात घडणारी गोष्ट आहे.
चित्रपटात भूषण प्रधान, केतकी नारायण आणि लहानगी केया इंगळे यांच्या भावनिक अभिनयाची मोहोर उमटलेली आहे. तिघांची पडद्यावरची केमिस्ट्री ही या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे.लायन हार्ट प्रॉडक्शन प्रा.लि.प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती जॉइसी पॉल जॉय यांनी केली असून, सह-निर्माते सिबी जोसेफ आणि जॅकब जेव्हियर आहेत. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन क्रिस्टस स्टीफन यांचे असून, त्यांनी बाप लेकिच्या नात्यातील सूक्ष्म भावना अत्यंत संवेदनशीलतेने उलगडल्या आहेत. रूपांतरित पटकथा आणि संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचं छायांकन एल्धो आयझॅक, संकलन सुबोध नारकर आणि कला दिग्दर्शन अनिल केदार यांनी उत्कृष्टरीत्या साकारलं आहे.