मुंबई : शिक्षण विभागाकडे प्रलबित असलेल्या थकीत बिलाच्या वसुलीसाठी एका तरुण ठेकेदाराने 17 बालकांना ओलीस ठेवण्याची धक्कादायक प्रकार गुरुवारी दुपारी पवईत घडला.
महावीर क्लासिक इमारतीत जवळपास चार तास चाललेल्या या ओलीस नाट्यात मुंबई पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर करून सर्व बालकांसह एकूण 19 जणांची सुखरूप सुटका केली.
रोहित आर्य असे या तरुण ठेकेदाराचे नाव असून त्याचे शिक्षण विभागाबरोबर केलेल्या स्वच्छता मोहीम प्रकल्पाचे दोन कोटीचे बील थकीत होते. त्यामुळे सरकारवर दबाव टाकण्यासाठी त्याने मुलांना वेब सीरिज ऑडिशनच्या नावाखाली बोलावून आर ए स्टेडिओ मध्ये डांबून ठेवले होते.
आर्य याने मुलांना बंदी बनविल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून शासनाच्या प्रतिनिधीशी चर्चा करण्याचे आवाहन केले होते. त्याच्याकडे एअरगन व रासायनिक द्रव्य ( केमिकल) मिळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
नेहमी गजबजलेल्या मुंबईत भरदिवसा घडलेल्या हा प्रकारामुळे संबंधित पालकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. आपली मुले सुखरूपपणे बाहेर आल्यानंतर त्यांनी सुटकेचा निस्वास सोडला.
या घटनेचे राजकीय पडसाद उमटत आहेत. ठेकेदारांची थकीत बिलाबद्दल विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. रोहित आर्या चा तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या समवेतचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे.
पवईतील महावीर क्लासिक सोसायटीतील आरए स्टेडिओ गेल्या सहा दिवसांपासून वेब सीरिजच्या नावाखाली 10 वर्षांखालील मुलांचे ऑडिशन सुरू होते. आज त्यासाठी 17 मुले आली होती. त्याचबरोबर आर्य समवेत त्याला सहाय्य करण्यासाठी एक वरिष्ठ नागरिक व अन्य एकजण असे एकूण 20 जण हॉलमध्ये होती.
दुपारी एक वाजला तरी रोहित आर्य याने मुलांना जेवण्यासाठी सोडले नाही. त्यामुळे बाहेर थांबून असलेल्या पालक चिंतेत पडले. त्यानंतर मुले स्टेडिओच्या बंदिस्त खिडक्यावर हात आपटत ओरडत असल्याचे काहींच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी दीडच्या सुमारास पोलिसांना फोन करून हा प्रकार कळविला.त्यानंतर तातडीने घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा आला. रोहित आर्या याने एअर गनचा धाक दाखवून 17 मुले, एक ज्येष्ठ नागरिक आणि एक सामान्य व्यक्ती अशा 19 जणांना डांबून ठेवल्याचे उघड झाल्यानंतर आणखी कुमुक मागविण्यात आली.त्याचवेळी रोहित आर्यन आपला व्हिडिओ बनवून त्याद्वारे मागण्या मांडल्या. जर आपल्याला सरकारशी बोलण्याची संधी न दिल्यास मी हॉलला आग लावून आत्महत्या करेन व त्यामध्ये मुलाना काही दुखापत झाल्यास त्याला आपण जबाबदार नसल्याची धमकी त्याने दिली होती.
पोलिसांची एक टीम रोहित आर्य याच्याशी चर्चा सुरु केली. त्याचवेळी दुसरी टीम मुलाना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होते. तो चर्चेला फारसा प्रतिसाद देत नसल्याने एका अधिकाऱ्यांनी धाडसाने बाथरूममधून प्रवेश केला. आतील एका व्यक्तीच्या मदतीने सर्व बंधकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. रोहित हा शरण येण्यास तयार नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या दिशेने गोळी झाडली. त्याच्या छातीवर गोळी लागल्याने तो जागीच पडला. त्यावेळी सर्व पोलिसांनी हॉलमध्ये प्रवेश करून बंधक असलेली 17 मुलासह सर्व 19 जणांना बाहेर नेले.
जखमी रोहितला सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र त्याचा काही वेळातच मृत्यू झाला.
या प्रकाराने मोठी खळबळ उडाली असून लहान मुलांची सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
————
रोहित आर्या याने व्हिडिओद्वारे सांगितले की, “मी दहशतवादी नाही. माझ्या काही साध्या मागण्या आहेत. मी आत्महत्या करण्याऐवजी मुलांना बंदी बनवले. मला संवाद साधायचा आहे, काही लोकांशी बोलायचे आहे, प्रश्न विचारायचे आहेत. पैशाची मागणी नाही. १ मे पासून उपोषण करतो, तरीही ‘आज-उद्या’ असे होत आहे. आता तीव्र उपोषण सुरू केले, पाणीही घेणार नाही. गांभीर्य समजले तर बरे, नाहीतर जय श्री राम!” तो पुढे म्हणाला, “मी एकटा नाही, अनेकांना हा प्रश्न आहे. सोल्युशनसाठी संवाद हवा.” प्राथमिक माहितीनुसार, शिक्षण विभागासाठी स्वच्छता मॉनिटर प्रोजेक्टसाठी लोन काढले होते. त्याचे पैसे सरकारकडे अडकले असून, कोटी रुपयांचे नुकसान झाल्याने लक्ष वेधण्यासाठी हे कृत्य केल्याचे त्याचे म्हणणे आहे.
—————=
थर्सडे चित्रपटाप्रमाणे कट
शिक्षण विभागाबरोबर केलेल्या स्वच्छता प्रकल्पाच्या कामातील दोन कोटीचे थकीत बिल न मिळाल्याने रोहित आर्या हा प्रचंड अस्वस्थ होता. बील मिळावे, यासाठी तो काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसला होता.मात्र सरकारकडून काहीच कार्यवाही होत नसल्याने त्याने मुलांना ओलीस धरण्याचा मार्ग पत्करला. त्यासाठी गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘थर्सडे’ या हिंदी चित्रपटातील कथेप्रमाणे ऑडिशनच्या बहाण्याने मुलांना ओलीस धरले. मात्र त्यामध्ये त्याला आपला जीव गमवावा लागला.
 
	    	 
                                

















 
                