सोलापूर – शहराच्या विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ग्वाही ही प्रभाग क्रमांक २२ मधील नागरिकांसाठी मोठी आश्वासक बाब ठरली आहे. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामवाडी, लिमयेवाडी, विजापूर नाका आणि प्राणीसंग्रहालय परिसरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचा ठाम शब्द दिला. या घोषणेमुळे प्रभाग २२ मधील विकासाला नवे बळ मिळाले असून, नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करणारे भाजपाचे उमेदवार किसन जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानले. मुख्यमंत्री जे बोलतात ते करून दाखवतात. देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वावर आम्ही जो विश्वास ठेवला होता, तो आज पूर्णपणे सार्थ ठरला आहे. त्यामुळे आता प्रभाग २२ चा विकास थांबणार नाही, तर वेगाने पुढे जाणार आहे, असे जाधव म्हणाले. रामवाडी व लिमयेवाडी भागातील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा तसेच विजापूर नाका परिसरातील मूलभूत सुविधांच्या कामांना या निधीमुळे गती मिळणार आहे. विशेषतः रोज पाणीपुरवठ्याची घोषणा ही नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर तोडगा निघणार आहे. महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयाचा स्वतंत्र विकास आराखडा तयार असून, त्यासाठीही आमदार कोठे यांच्या प्रयत्नांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाठबळ दिले आहे. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असताना, महापालिकेतही भाजपाची सत्ता आल्यास विकासकामे अधिक वेगाने आणि पारदर्शकपणे होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
किसन जाधव यांनी सांगितले की, निवडून आल्यानंतर उर्वरित राहिलेली सर्व कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील आणि प्रभागाच्या शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचवला जाईल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे प्रभाग २२ च्या नागरिकांना आता विकासाबाबत ठाम भरोसा मिळाला आहे. या निधीमुळे परिसराचा चेहरामोहरा बदलणार असून, भाजपाच्या माध्यमातूनच प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा ठाम विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.





















