सोलापूर – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर व अर्ज फौंडेशन गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी लैंगिक तस्करी प्रतिबंध काळजी व लढा या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा कार्यशाळेचे उद्घाटक मनोज शर्मा हे अध्यक्ष स्थानी होते.
अध्यक्षीय मनोगतात मनोज शर्मा यांनी मानवी लैंगिक तस्करी वर प्रतिबंध करणे हे प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असल्याचे नमूद केले. कार्यशाळेत लैंगिक तस्करी या गंभीर सामाजिक प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली. या प्रसंगी व्यासपीठावर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ओ. एस. पाटील, एस. एस. शिंदे, एम. बी. कुडते, ए.एस. बिराजदार आदी न्यायाधीश व अर्ज फौंडेशन चे फॉउंडर अरुण पांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी, विधी सेवेचे पॅनल विधीज्ञ, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, महिला व बाल विकास विभाग, बाल न्यायमंडळ, सखी वन स्टॉप सेंटर आदीं सहभागी झाले होते.
कार्यशाळेत अरुण पांडे यांनी भारतातील वाढती लैंगिक तस्करी, तिची कारणं, कायदेशीर तरतूदी तसेच बळी पडलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक उपाययोजना या विषयी मार्गदर्शन केले. डॉ. रुपेश पाठक लैंगिक तस्करी बाधित महिलांची मानसिकतेविषयी व सामाजिक भूमिकानविषयी मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्त्यांनी जनजागृती, प्रतिबंध आणि पुनर्वसन या तीन पातळयांवर एकत्रितपणे काम करण्याची गरज अरुण पांडे यांनी व्यक्त केली.
या कार्यशाळेत उपस्थित सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रश्न उपस्थित केला की “तस्करीच्या घटनांमध्ये प्रशासन, पोलीस आणि समाज यांच्यात समन्वय वाढवण्यासाठी ठोस यंत्रणा तयार करता येईल का?” या चर्चेला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कार्यशाळेचा उद्देश समाजात संवेदनशिलता निर्माण करुन प्रत्येक नागरिकाने ‘तस्करीविरुध्द आवाज उठवणे’ हा सामाजिक संकल्प घ्यावा, असा होता.
समारोपावेळी सर्वांनी सुरक्षित समाज सन्मानाचे जीवन हा संदेश देत लैंगिक तस्करीविरोधी लढयात सक्रिय राहण्याची प्रतिज्ञा केली.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी आणि अर्ज फौंडेशन च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेचे सुत्रसंचालन विधीज्ञ शिवकैलास झुरळे यांनी केले तर आभार डॉ. रुपेश पाठक यांनी मांडले.


















