सोमवार 22 जानेवारी रोजी रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असल्याने राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या 22 जानेवारी ऐवजी 23 जानेवारी (मंगळवार) रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. तरी या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. सुधारीत कार्यक्रमानुसार मतदारयादीची अंतिम प्रसिध्दी करण्याचा दिवस 22 जानेवारी (सोमवार) असा होता. तथापि, महाराष्ट्र शासनाच्या 19 जानेवारी, 2024 च्या अधिसूचनेनुसार परक्राम्य संलेख अधिनियम (1881 चा 26)च्या कलम 25 अन्वये सोमवार 22 जानेवारी रोजी रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
त्यानुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दि.19 जानेवारी 2024 च्या पत्रान्वये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदारयाद्या 23 जानेवारी (मंगळवार) रोजी प्रसिध्द करण्याचे निर्देश दिले आहेत. तरी, या बदललेल्या वेळापत्रकाप्रमाणे मतदारयादीची अंतिम प्रसिध्दी मंगळवार 23 जानेवारी रोजी करण्यात येईल, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले आहे.