सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा देणार्या ‘फ्लाय 91 ’ या विमान कंपनीची हैदराबादला जाणारी विमानाची पहिलीच फेरी रद्द करण्याची नामुष्की फ्लाय 91 कंपनीच्या विमान व्यवस्थापन प्रशासनावर मंगळवारी आली. विशेष म्हणजे तब्बल एक तासाहुनही अधिक वेळ हैदराबादला जाण्यासाठी 50 प्रवाशांना घेवून ‘टेक ऑफ’ घेण्याच्या तयारीत असलेले फ्लाय 91 कंपनीचे विमान हवेत न झेपावताच ते विमान पायलटने माघारी घेत पॅसेंजर टर्मिनल समोर आणुन उभे केले व प्रवाशांना खाली उतरवुन ती फेरी रद्द केल्याचे व्यवस्थापन प्रशासनाने जाहिर केले. त्यानंतर अर्ध्या तासाने आपल्या 10-15 स्टाफना घेवून ते विमान मोपाच्या दिशेने रवाना झाले.
हवेच्या वाढत्या दाबामुळे विमान टेक ऑफ घेवू शकले नसल्याचे कारण कंपनीच्या व्यवस्थापन प्रशासनाकडुन देवून वेळ मारून नेण्यात आली. मात्र उपलब्ध माहितीनुसार त्या नियोजित विमानाचा व्यवस्थापनाकडुन चुकीचा रूट (हवाई मार्ग) टाकण्यात आला होता त्यामुळेच ऐन वेळी कंपनीला प्रवाशांनी भरलेले विमान रद्द करण्याची नामुष्की ओढवल्याचे समजते. सिंधुदुर्गातील बहुचर्चित अशा सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळावरून दिड वर्षापुर्वी अलायन्स एअरची प्रवाशी वाहतुक सेवा सुरू आहे. मात्र ही सेवा रामभरोसे असल्यामुळे आधिच प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. त्यातच देशांतर्गत सेवा देणारी फ्लाय 91 ही कंपनी प्रवाशी वाहतुक सेवा देण्यासाठी चिपी विमानतळावर सज्ज झाली. फ्लाय 91 कंपनीचे पहिले विमान चिपी विमानतळावरून सोमवारी शुभारंभाच्या दिवशीच 58 प्रवाशांना घेवून बेंगळूरूला मार्गस्थ झाले. त्यानंतर मंगळवारी त्याच कंपनीचे विमान हैदराबादसाठी 12 वाजुन 10 मिनिटांनी टेक ऑफ घेणार होते ते विमान 1 वाजुन 56 मिनिटांनी हैदराबादला पोहोचणार होते. हैदराबादला जाण्यासाठी कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील उद्योजक, व्यवसायिक, माध्यम प्रतिनिधी, युट्युबर याना निमंत्रित करण्यात आले होते. त्या सर्व प्रवाशांना बोर्डींग पासही देवून तपासणीची संपुर्ण प्रक्रिया पुर्ण करत विमानात बसविण्यात आले. विमानातील एअर हॉस्टेसने विमान टेक ऑफ घेण्यापुर्वी देण्यात येणार्या आवश्यक त्या सर्व सूचना प्रवाशांना दिल्या.
त्यांनतर रन – वे वर स्टार्ट पॉईंटला विमान मार्गस्थ झाले. मात्र त्या विमानाने हवेत टेक ऑफ घेतलाच नाही, जवळपास एक तासहुन अधिक वेळ ते विमान प्रवाशांसह रन-वे वरच थांबले होते. आतील प्रवाशांनी काही वेळाने विमानाच्या व्यवस्थेबाबत आपआपसात चर्चा सुरू केली. त्यानंतर विमानामधील कंपनीच्या मेंबर्संनी प्रवाशांना पाणी, बिस्कीटची व्यवस्था केली. काही वेळातच विमान टेक ऑफ घेईल असे सांगुन प्रवाशांना काहीसा धीर दिला. मात्र पुढच्या काही मिनिटात रन-वे वर टेक ऑफ घेण्यासाठी गेलेले विमान पुन्हा पॅसेंजर टर्मीनलच्या समोरील खुल्या जागेत पायलटने आणुन लावले. त्यानंतर प्रवाशांना खाली उतरविण्यात आले व तांत्रिक अडचणीचे कारण देत विमान फेरी रद्द केल्याचे विमान कंपनी व्यवस्थ्यापनाने जाहिर केले. अशाच प्रकारे विमानसेवा राहिली तर प्रवाशी कसे येणार? यापुर्वीची एअर अलायन्स कंपनीची व्यवस्था अशीच असल्यामुळे प्रवाशांनी पाठ फिरवली. त्यामुळे या कंपनीने तरी प्रवाशांना चांगली व्यवस्था द्यावी अशी कुजबूज प्रवाशांनी आपआपसात सुरू केली होती.
… तर अलायन्स एअरचे विमान कसे मार्गस्थ झाले?
हवेच्या दाबाचे कारण देत फ्लाय 91 विमान कंपनीने हैदराबादकडे जाणारे विमान रद्द केले. मात्र त्याच दिवशी एअर अलायन्सचे मुंबईहुन सिंधुदुर्ग ( चिपी ) विमानतळावर प्रवाशांसह आलेले विमान पुन्हा सिंधुदुर्ग ( चिपी) ते मुंबई असे टेक ऑफ घेत मंगळवारी सायंकाळी मार्गस्थ कसे झाले? असा सवाल फ्लाय 91 मधुन प्रवास करण्यासाठी निघालेल्या व अचानक विमान रद्द झाल्यामुळे माघारी परतलेल्या प्रवाशांनी उपस्थित केला. एकुणच फ्लाय 91 कंपनीची सुरूवातीलाच अशी अवस्था असेल तर यापुढे ही कंपनी चांगल्या प्रकारे प्रवाशांना सुविधा देणार का? असा प्रश्न जिल्हावासियातुन उपस्थित होत आहे.