सोयगाव / संभाजीनगर – तालुक्यात पर्यावरणपूरक उपक्रमांना बळ देणारे आणि स्वच्छता उपक्रमांना नवा आयाम देणारे सोयगाव तालुक्यातील पहिले प्लास्टिक कचरा निर्मूलन व पुनर्वापर केंद्र जरंडी ग्रामपंचायतीमध्ये सुरू होणार आहे.स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन,जिल्हा परिषद यांना याबाबत जरंडी ग्रामपंचायतीने प्रस्ताव पाठविला असून यांची अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर अत्याधुनिक मशिनरीसह हा प्रकल्प कार्यरत येईल असे ग्रामपंचायत अधिकारी सुनिल मंगरुळे यांनी सांगितले आहे.
सोमवार, (दि. १९) नोव्हेंबर रोजी गटविकास अधिकारी शिवाजी यमूलवाड यांनी केंद्रच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली.यावेळी बोलताना ते म्हणाले,तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमधून जमा होणारा प्लास्टिक कचरा येथे वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी तयार केला जाणार आहे.यमूलवाड यांनी पुढे सांगितले की, या प्रकल्पामुळे केवळ तालुक्यातील प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुलभहोणार नाही तर जरंडी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.
पाहणीवेळी सरपंच स्वातीताई पाटील,उपसरपंच संजय पाटील,वंदनाताई पाटील,मधुकर सोनवणे,मधुकर पाटील,विस्तार अधिकारी (पंचायत) अशोक दौड,विष्णू वाघ,कर्मचारी संतोष पाटील,सतिष बाविस्कर, आदी उपस्थित होते.
जरंडी गाव प्लास्टिक मुक्त
जरंडी ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून तालुक्यातील जरंडी गाव प्लास्टिक मुक्त झालेले आहे गावात प्लास्टिक वापरावर बंदी घातली असून आढळून आल्यास दंडात्मक कारवाई ची तरतूद करण्यात आलेली आहे.


























