सोलापूर : ताई – माई – अक्का….. आला आला…… विचार करा पक्का अशी घोष वाक्य अवघ्या शहरात कानावर पडत आहेत. सोलापूर महापालिका निवडणुक प्रचाराचा धुराळा शहरभर पसरला आहे. उमेदवार-कार्यकर्ते अथकपणे प्रचारात व्यस्त आहेत. सोलापूर शहरात महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार सध्या चांगलाच रंगात आला आहे. सकाळी साडेसात वाजताच घराबाहेर पडणारे उमेदवार रात्री साडेनऊ-दहा वाजता घरी परतत आहेत.
दिवसभर प्रचार फेरी, बैठका, गाठीभेटी, नियोजन यामध्ये उमेदवारांसह कार्यकर्तेही व्यस्त दिसत आहेत.
कपाळावर टिळा, अंगावर पांढरे शुभ्र कपडे, गळ्यात पक्षाचा पंचा असा पारंपारिक वेश परिधान करून मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे. १०२ जागांसाठी ५६४ उमेदवार रिंगणात उतरले असून सर्वच पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. कॉलनी, रस्ते, चौक, उद्याने, मंदिरे, चहाच्या टपऱ्या, सलून आदी ठिकाणी उमेदवार मतदारांची भेट घेत आहेत. घरोघरी जाऊन प्रचार पत्रक देताना, अपार्टमेंटमधील प्रत्येक मजल्यावर चढताना उमेदवारांची दमछाक होत असली तरी उत्साह मात्र कायम आहे.
आधुनिक प्रचारासोबतच रिक्षावर भोंगा लावून पारंपरिक प्रचारालाही जोर देण्यात आला आहे.
महिला उमेदवार आणि महिला कार्यकर्त्याही प्रचारात आघाडीवर असून सकाळ-संध्याकाळ प्रचार फेरीत सक्रिय सहभाग घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी एकाच ठिकाणी नाश्ता, जेवणाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रचाराचा हा धुराळा शहरभर पसरलेला दिसत आहे.
– सोलापूर महापालिकेसाठी १०२ जागा, ५६४ उमेदवार मैदानात
– आधुनिक व पारंपरिक प्रचार पद्धतींचा एकत्रित वापर
– उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा दिवस-रात्र प्रचारात सहभाग

















