सोलापूर – शहर सायबर पोलीस स्टेशनकडील दाखल गुन्हयातील फरार आरोपी है परदेशात (नेपाळ) येथे राहुन तेथील त्याचे चायनीज व नेपाळी साथीदार याचे सोबत संगणमत करुन, लाखो रुपयाची ऑनलाईन आर्थीक फसवणूक करणाऱ्या व 1 वर्षापासून फरार असलेला सराईत आरोपीता विरुध्द लुक आऊट नोटीसच्या मध्यमातुन दिल्ली येथील इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळ येथून अटक करण्यात आली आहे.
फिर्यादीशी आरोपीने ऑनलाईन संपर्क साधून CRYPTO CURRENCY TRADING मध्ये 10 ते 300 टक्के फायदा करून देण्याचे अमिष देऊन फिर्यादीस ऑनलाईन सुमारे 72 लाख 64,000/- रूपये इतकी रक्कम भरण्यास भाग पाडून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. या गुन्हयात सोलापूर शहर सायबर पोलीसांनी आत्तापर्यंत एकूण 4 आरोपी निष्पन्न केले असून यातील सुत्रधार आरोपी रोज मगर थापा वय २३ पत्ता – बोसन, दक्षिणखली-१ काटमांडू, नेपाळ व त्याचे सहकारी आरोपी दोरजे तमांग यांनी फिर्यादी यांच्या फसवणुक रकमेपैकी काही रक्कम सारस्वत बँक मध्ये असलेल्या M ENGINEERING नावाच्या CURRENT ACCOUNT मध्ये वर्ग करून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपी रोज मगर थापा हा नेपाळ येथील नागरिक आहे. नेपाळ येथे संपर्कात आलेल्या चीनी नागरिकांच्या सांगण्यावरून तो भारतात आपल्या अन्य साथीदारां सोबत येऊन भारतीय नागरिकांना COMISSION चा आमिष दाखवून त्यांचे बँक खाते गुन्ह्यात वापरण्यास घेऊन खात्यातून फसवणुकीचे रक्कम स्वीकारून पुढे वर्ग करत असे. हा आरोपीने दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिमबंगाल, मध्य प्रदेश व मणिपूर येथे राहून फसवणुकीचे काम करत होता. आरोपी हा नेपाळचा नागरिक असल्याने तपासादरम्यान त्याचे PASSPORT ची माहिती मिळवून त्याचे विरुद्ध सन 2025 मध्ये लुक आऊट नोटीस जारी केली होती.
गुन्हा दाखल झालेपासुन आरोपी बाहेरच्या देशात असल्याने, IMMIGRATION विभाग यांच्या संपर्कात राहून आरोपीचा मागोवा घेवून, त्यास दि. 8 मार्च 2026 रोजी इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली येथुन ताब्यात घेवून ना. न्यायालया समक्ष हजर केले असता 6 दिवसाची पोलीस कोठडी (रिमांड) मिळाली आहे. तरी आरोपीताकडे तपास चालु असुन, इतर साथीदाराबाबत माहिती घेवून त्यांचे नाव निष्पन्न करून त्यांचेवर अटकेची कारवाई करण्याची तजवीज ठेवून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, पोसई प्रविण भोपळे, पोसई नागेश इंगळे, पोह मच्छिद्र राठोड, पोह प्रकाश गायकवाड, पोको रतिकांत राजमाने या तपास पथकाने पार पाडली.
चौकट
नागरीकांना आवाहन
काही लोक आपले नाव वापरून बँक खाते उघडण्यास सांगतात व त्यासाठी पासबुक, एटीएम कार्ड, चेकबुक, मोबाईल सिमकार्ड, OTP इत्यादी कागदपत्रे किंवा माहिती मागतात. ते लोक “तुम्हाला कमिशन मिळेल” किंवा “जास्त नफा मिळेल” असे सांगून लोकांना फसवतात. अशा लोकांना बँकेची किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये. अन्यथा तुमच्या बँक खात्याचा वापर करून इतर राज्यांतील लोकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. त्या फसवणुकीचे पैसे तुमच्या खात्यात जमा करून नंतर काढले जातात आणि त्यामुळे तुम्ही नकळत गुन्ह्यात आरोपी ठरू शकता. म्हणून सर्व नागरिकांनी सतर्क राहावे. कोणालाही लालच देऊन बँक खाते उघडण्यास किंवा माहिती देण्यास तयार होऊ नये. तसेच सोशल मीडियावर जास्त नफा मिळवून देण्याच्या जाहिरातींवर विश्वास ठेवू नये. आरोपी आणि नमूद बँक खाते या विषयी कोणाचे तक्रार असल्यास व माहिती असल्यास सोलापूर शहर सायबर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा, अशा प्रकारची घटना घडल्यास तात्काळ सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, हे आवाहन सोलापूर शहर पोलीसांकडून सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.



























