सोलापूर – विधायक दृष्टीकोनातून होणारे मानवतेचे कार्य हे नव राष्ट्राच्या उभारणी प्रेरक आहे. त्या दृष्टीने काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सामाजिक संस्थेला एकाच व्यासपीठावर आणून त्यांचा सन्मान करीत त्यांना प्रोत्साहन देण्यासह इतरांना प्रेरणा देण्याची विधायकता रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रोने केली आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. श्रृतीश्री वडकबाळकर यांनी केले.
जुळे सोलापुरातील विद्या कॉम्प्युटर्स व रोटरी क्लब ऑफ सोलापूर मेट्रो यांच्या तर्फे शनिवारी (दि. ११) ‘नेशन बिल्डर’ पुरस्कारांचे वितरण रामलाल चौकातील साईप्रसाद हॉटेल येथे झाले. त्याप्रसंगी डॉ. वडकबाळकर बोलत होत्या. प्रवर डाकपाल सुखदेव मोरे, निसर्गोपचार तज्ज्ञ हेमंत खेडेकर, रोटरी क्लब आॅफ मेट्रोचे अध्यक्ष अमित कामतकर, सचिव डॉ. नील अंजुटगी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. वडकबाळकर म्हणाल्या,“ राष्ट्राच्या उभारणीमध्ये प्रत्येक घटकांचे योगदान अनमोल असते. वंचित घटकातील लोकांसाठी समर्पित भावनानी करण्यात येणाऱ्या कामांतूनच आपुलकी, एकात्मतेची भावना वाढते. माणसाची आेळख ही पैसा अन् सत्ता यापेक्षाही पाठीमागे त्याच्या गुण व अवगुणांबाबत होणाऱ्या चर्चेतून त्याची खरी आेळख होत असते. सर्वप्रथम राष्ट्र, सर्वांप्रती आपुलकी जपणाऱ्यांना लोक कायम लक्षात ठेवातात, तशी आेळख प्रत्येकाने निर्माण करावी, असेही आवाहन त्यांनी केले. माहिती व तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे माणूस स्वत:ची विचारक्षमता, कल्पकता विसरत असल्याचे चित्र आहे. आबालवृद्धांना या मोबाईल, एआय च्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक घटकाने पुढे येऊन काम करण्याची गरज आहे, असेही तयांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक अध्यक्ष अमित कामतकर यांनी केले. सचिव डॉ. अंजुटगी यांनी रोटरीच्या कार्य, उपक्रमांची माहिती दिली. आदिती कामतकर यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी श्री. मोरे, अॅड. अग्निहोत्री, श्री. खेडेकर यांची समयोचित भाषणं झाली.
नितीन वैद्य यंना बाळकृष्ण कामतकर स्मृती पुरस्कार सोलापुरातील प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक नितीन वैद्य यांना विद्या फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या (स्व.) बाळकृष्ण रंगनाथ कामतकर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. गाैरवपत्राचे वाचन अॅड. अग्निहोत्री यांनी केले. तर, सूत्रसंचालन आदित्य कामतकर यांनी केले.