सोलापूर : बुधवार पेठ येथील महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सफाई कामगार वसाहतीची गॅलरी शनिवारी रात्री कोसळल्याने येथील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र एका दुचाकी वाहनाचे नुकसान झाले.
रात्री 10 वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीची भिंत कोसळली. कोसळलेला भाग खाली पार्किंग करण्यात आलेल्या एका वाहनावर पडून त्याचे नुकसान झाले, मात्र यावेळी सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती समजतात महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, इतर अधिकारी तसेच राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक विनायक विटकर, कामगार नेते बाली मंडेपू यांनी घटनास्थळी भेट दिली.
ही वसाहत तीन मजली असून त्यामध्ये एकूण २४ कुटुंबे राहतात. गॅलरी कोसळल्यावर ग्राउंड फ्लोअरला असलेल्या घरासमोरील मोटर सायकलचे नुकसान झाले तर विजेच्या तारा तुटून मोठा आवाज झाला. यामुळे परिसरात एकच घबराट पसरली.
16 कुटुंबीयांची दुसरीकडे राहण्याची सोय
ही घटना घडल्यावर महापालिकेची यंत्रणा हलली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. या इमारतीमधील नागरिकांच्या सुरक्षेला बाधा पोहचू नये म्हणून या इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील 16 कुटुंबीयांना दुसरीकडे हलवण्यात आले. महापालिकेने धोकादायक झालेल्या या इमारतीबाबत पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.




















