सांगोला – चोपडी जिल्हा परिषद गटातून सर्वसाधारण जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी चोपडी गटाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प जाहीर केला आहे. विकास हा केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता तो प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे. चोपडी जि.प.गटाचा सर्वांगीण विकास हेच माझे एकमेव ध्येय आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
चोपडी जि.प.गटाचे महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी नाझरे येथील दत्तानंद स्वामी समाधी दत्त मंदिर, श्री बाळब्रह्मचारी योगी समर्थ सद्गुरू संजीवा स्वामी महाराज समाधी, श्री अंबिका मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री महादेव मंदिर, दर्गा या ठिकाणी मनोभावे दर्शन घेऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी नाझरे गावातून पदयात्रा काढण्यात आली. यावेळी चोपडी पं.स.चे उमेदवार अजय सरगर, राजुरी पं.स.चे उमेदवार सदाशिव दबडे यांच्यासह सुरेशकाका चौगुले, संजय शेळके, मंगेश रायचुरे, हणमंत गोसावी, विनायक सरगर, भालचंद्र भंडारे, दिपक बनसोडे, अक्षय सरगर, भारत चव्हाण, जालिंदर सरगर, भारत शेळके, दादा ननवरे, अमोल तेली, ज्ञानेश्वर सरगर, भाऊ पाटील, आनंदा बनसोडे, माऊली बनसोडे, संतोष घोडके, नागेश भंडारे, अण्णा पाटील, उपसरपंच बंडू केदार, संभाजी चव्हाण, बाळासाहेब केदार, मुकुंद पाटील उपस्थित होते.
चेतनसिंह केदार सावंत मतदारांशी संवाद साधताना म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आ.शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडी जि. प.गटात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण यांसह सर्व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष भर देण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लावून गावागावात पायाभूत सुविधांचे जाळे मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
चोपडी जि.प.गटात शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार असून, त्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष यंत्रणा उभारली जाईल. चोपडी जि.प.गटाचा विकास करून लोकांच्या विश्वासावर खरे उतरून पारदर्शक, गतिमान आणि विकासाभिमुख कारभार देण्याचा प्रयत्न राहील.
– चेतनसिंह केदार सावंत
























