वैराग – “कष्टाची भाकरी खाण्यात जे समाधान आहे, ते दुसऱ्याच्या धनात नाही,” हा विचार कृतीत उतरवत वैराग येथील भाजी विक्रेत्या शोभा काळे यांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे. भाजीच्या पाटीत सापडलेली सुमारे १ लाख २५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी मूळ मालकाला परत करून त्यांनी समाजासमोर प्रामाणिकपणाचा एक नवा आदर्श उभा केला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील वैराग येथील श्री. सज्जनराव शेंडगे हे काही दिवसांपूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील (बार्शी कॉर्नर, पोलीस स्टेशन समोर) शोभा काळे यांच्या दुकानात भाजी खरेदीसाठी गेले होते. भाजी घेत असताना त्यांची एक तोळ्याची सोन्याची अंगठी अनावधानाने भाजीच्या पाटीत पडली. अंगठी हरवल्याचे लक्षात आल्यावर शेंडगे यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु ती सापडली नाही.
अन् ती अंगठी पाटीत चमकली…
दोन-तीन दिवसांनंतर पाटीतील भाजी बदलत असताना शोभा काळे यांना ती सोन्याची अंगठी सापडली. परिस्थिती गरिबीची असली तरी मनाची श्रीमंती दाखवत त्यांनी ती अंगठी स्वतःकडे न ठेवता, ती कोणाची असू शकते याचा शोध सुरू केला. आज सकाळी शेंडगे यांचे बंधू चौकातून जात असताना शोभा मावशींनी त्यांना हाक मारली आणि अंगठीबाबत विचारणा केली. शेंडगे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ती अंगठी त्यांचीच असल्याची खात्री झाली आणि शोभा मावशींनी ती सन्मानाने परत केली.
बक्षिसाचा मोह नाकारला
अंगठी परत मिळाल्यानंतर शेंडगे कुटुंबीयांनी कृतज्ञता म्हणून काही बक्षीस देऊ केले असता, मावशींनी ते नम्रपणे नाकारले. “आम्हाला आमचा परमेश्वर कष्टाचे भरपूर देतो, तुमचे आम्हाला काही नको,” असे म्हणत त्यांनी केवळ समाधानाला महत्त्व दिले.
दोघांच्या विशेष प्रतिक्रिया> “आम्ही कष्टावर जगणारी माणसं आहोत. दुसऱ्याची वस्तू कितीही मौल्यवान असली तरी ती आमच्यासाठी मातीसमान आहे. कोणाचे तरी नुकसान झाले होते, ती वस्तू त्यांना परत मिळाल्याचा आनंद आणि समाधान आज कोणत्याही बक्षिसापेक्षा मोठे आहे. परमेश्वर आम्हाला कष्टाचे फळ देतो, त्यातच आम्ही समाधानी आहोत.”> — शोभा काळे (भाजी विक्रेत्या, वैराग)
>> “आजच्या महागाईच्या काळात सव्वा लाखाची सोन्याची अंगठी सापडूनही ती परत करणे, हे शोभा मावशींच्या संस्कारांचे दर्शन घडवते. त्यांची परिस्थिती बेताची असली तरी त्यांचे मन अतिशय मोठे आहे. अशा प्रामाणिक व्यक्तींमुळेच समाजातील विश्वास टिकून आहे. आम्ही काळे कुटुंबाचे ऋणी आहोत.”> — श्री. सज्जनराव शेंडगे (अंगठी मालक
या घटनेची माहिती वार्यासारखी पसरताच संपूर्ण वैराग परिसरातून आणि सोशल मीडियावरून शोभा काळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

















