जेऊर – वयाच्या शंभरीनंतरही पहाटे उठून व्यायाम, दररोज साधा भाजी भाकरीचा शाकाहारी आहार ,नित्यनियमाने सकाळी शेतातील घरापासून पायी चालत देवदर्शनासाठी गावात येणारे शेटफळ येथील प्रल्हाद पोळ हे आजोबा वयाच्या 103 व्या वर्षीही त्यांचा तरुणांना लाजवेल असा उत्साह आहे ,आजही त्यांची तब्येत ठणठणीत असून आजपर्यंत बी. पी.शुगरची गोळी घेण्याची गरज पडलेली नाही आरोग्याची कसलीही तक्रार नसलेल्या आजोबा कडे पाहून गावातील तरुणांनाही उत्साह येतो.
आज काही लोकांना वयाची पन्नाशी गाठली की आरोग्याच्या अनेक तक्रारी सुरू होतात आपण फारच वृद्ध झाल्यासारखे वाटते. बीपी शुगर च्या गोळ्या सुरू होतात परंतु याला अपवाद आहेत शेटफळ येथील 103 वर्षाचे आजोबा येथील प्रल्हाद रामचंद्र पोळ यांचा जन्म 1922 साली झाला. घरात वारकरी संप्रदायाचा वारसा असल्याने जन्मानंतर पाचव्या दिवशी वडीलांनी तुळशीची माळ घातली. चौथीपर्यंत शिक्षण झाले शिक्षकांची नोकरी लागत असूनही वडिलांनी शेतातील काम करण्यासाठी जाऊ दिले नाही लहानपणापासून शेतात गुरे चरण्यापासून ते शेतातील सर्व कामे त्यांनी केली ती गेल्या चार-पाच वर्षापर्यंत नियमित सुरू होती . सध्या मुले व घरातील मंडळी त्यांना शेतातील काम करू देत नाहीत आजही चष्म्याशिवाय ते वाचतात स्वतःच्या दाताने ऊस सोलून खातात आरोग्याची कसलीही तक्रार नाही दवाखाना नाही बी.पी शुगरच्या गोळ्या नाही त्यांच्या या उत्तम आरोग्याचे रहस्य काय असे विचारल्यावर ते सांगतात सुरवातीपासूनच साधा सकस आणि पौष्टिक आहार घेतला घरी दूध दही तूप भरपूर असायचे लहानपणापासून व्यायामाची सवय आहे आजही दररोज पहाटे उठून व्यायाम करतो बैठका मारतो पोर्चच्या कट्ट्यावर हात ठेवून जोर काढतो, दररोज देवदर्शनासाठी चालत शेतातून गावात येतो. मुलांकडे एक चार चाकी गाडी घरात चार मोटारसायकली आहेत मुले नातवंडे गाडीवर चला म्हणतात परंतु शेतातील काम बंद झाले आहे चालणेही बंद झाले तर मला पुन्हा उठता बसताही येणार नाही म्हणून दररोज चालत गावात देवदर्शनसाठी येतो दिवसभरात साधारण चार ते पाच किलोमीटर चालतो. आयुष्यभर शेतीमध्ये काबाडकष्ट केल्यामुळे कधीही थकवा जाणवत नाही असे ते सांगतात.
या आजोबांना दोन मुले चार मुली सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे आयुष्यभर शेतात कष्ट करून त्यांनी काळी आईची सेवा केलेली आहे याबरोबरच वारकरी असल्याने पंढरीचा पांडुरंग हे त्यांचे दैवत असून त्याच्यावर त्यांची विशेष भक्ती आहे
प्रल्हाद पोळ हे आजोबा जुन्या काळातील अनेक घटनांचे साक्षीदार आहेत देशाच्या स्वतंत्र्यापूर्वी गोरे इंग्रज अधिकारी परिसरात घोड्यावरून शिकारीसाठी आलेले आपण पाहिल्याचे ते सांगतात , देश स्वातंत्र्य झाल्यानंतर चा जल्लोष त्यांनी पाहिलेला आहे, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जेऊर येथे स्वागत समारंभ होता त्यावेळी व मांगी येथे तळ्यावर काम करत असताना असे दोन वेळा आपण जवळून पाहिले आहे असे सांगतात महात्मा गांधी पंढरपूरला येणार आहेत हे कळल्यानंतर पंढरपूरला चालत गेल्याचे ते आवर्जून सांगतात. वयाच्या 100 वर्षानंतर ही त्यांची स्मृती चांगली आहे त्यांना अजून चांगले ऐकू येते चष्म्याशिवाय त्यांचे दररोज विविध ग्रंथाचे वाचन चालू असते



















