सोलापूर : लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षासाठी झटलेल्या कुरुहिनशेट्टी समाजाला सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी संधी द्यावी, अशी मागणी कुरुहिनशेट्टी ज्ञाती संस्थेने पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कुरुहिनशेट्टी समाजाने गत अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाला विविध निवडणुकांमध्ये एकमुखी पाठिंबा दिला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून आणण्यामध्ये या समाजाचे मोठे योगदान आहे. नुकत्याच झालेल्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी या समाजाकडून भाजपकडे उमेदवारी मागण्यात आली होती, मात्र पक्षाने संधी दिली नाही. तरीदेखील या समाजाने भाजपसमवेत एकनिष्ठ राहून अनेक प्रभागांमध्ये भाजपला यश मिळवून दिले. महापालिका निवडणुकीत या समाजाला संधी न मिळाल्याने निदान आता स्वीकृत नगरसेवकपदासाठी तरी संधी द्यावी, अशी या समाजाने भाजपला कळकळीची विनंती केली आहे.
स्वीकृत नगरसेवकपदाबाबत या समाजाच्यावतीने नुकतेच पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी कुरुहिनशेट्टी ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष नारायणराव संगा, सेक्रेटरी प्रा. संजय बुगडे, सहसचिव श्रीनिवास गडगी, खजिनदार श्रीनिवास जोगी व कुरुहिनशेट्टी समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर गोरंटी आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, मागील लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना या कुरुहिनशेट्टी ज्ञाती संस्थेने बिनशर्त जाहीर पाठींबा दिला होता. समाजाचे मेळावे घेऊन सातपुते यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत शहर मध्यचे उमेदवार देवेंद्र कोठे, सोलापूर शहर उत्तरचे उमेदवार विजयकुमार देशमुख व दक्षिण सोलापूरचे उमेदवार सुभाष देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिला. कुरुहिनशेट्टी ज्ञाती संस्थेच्या शिक्षण संकुलच्यावतीनेही सर्वानुमते संस्थेचा ठराव करुन समाजाच्यावतीने बिनशर्त जाहीर पाठिंबा घेऊन मेळावा घेण्यात आला.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत या समाजाने अनेक जणांना उमेदवारीची मागणी भाजपकडे केली होती, मात्र भाजपने संधी दिली नाही. तरीदेखील शहरातील विविध प्रभागात समाजाच्यावतीने एकजूटीने काम करुन भाजपचे पॅनल-टू-पॅनल भाजपा पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. याची फलश्रुती म्हणजे भाजपचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले आहेत.
एकंदर भाजपसमवेत एकनिष्ठ राहून काम केलेल्या या समाजाला महापालिका स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी द्यावी, असे निवेदनात नमूद आहे.
————————————————
फोटो ओळी
सोलापूर : आमदार देवेंद्र कोठे यांना निवेदन देताना
कुरुहिनशेट्टी ज्ञाती संस्थेचे पदाधिकारी.


























