नांदेड – “एक पुस्तक शंभर शिक्षकांच्या बरोबरीचे असते आणि एक चांगला शिक्षक संपूर्ण ग्रंथालयाच्या तोलामोलाचा असतो,” अशी व्याख्या आपण ऐकत आलो आहोत. पूर्वी शिक्षकांची अध्यापनशैली देणगीभावाने आणि निष्ठेने परिपूर्ण होती. मात्र काळाच्या ओघात शिक्षणव्यवस्थेमध्ये आणि शिक्षकांच्या भूमिकेमध्ये मोठे बदल झाले आहेत. आजच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहता शिक्षकांनी स्वतःकडे अंतर्मुख होण्याची तातडीची गरज आहे, असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलाचे माजी संचालक डॉ. बी. पी. बंडगर यांनी केले.
ते दि. २२ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या अधीसभा सभागृहात आयोजित कुलगुरू व्याख्यानमाला या कार्यक्रमातील पहिल्या व्याख्यानात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन होते. यावेळी समन्वयक डॉ. एस. जी. गट्टानी, डॉ. कृष्णा चैतन्य, रसायनशास्त्र संकुलाच्या संचालिका डॉ. संगीता माकोणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून पहिल्या पुष्पात डॉ. बंडगर यांनी “जगावे तरी कसे…!” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले.
आपल्या प्रभावी संवादात ते म्हणाले की, आयुष्य तीन गोष्टींकडून प्रेरणा घेऊन जगावे. निसर्गाकडून : निरपेक्ष भावनेने जगणाऱ्या आणि कोणताही मोबदला न घेता ऊर्जा देणाऱ्या निसर्गाकडे पाहून जगण्याची प्रेरणा मिळते. मित्रांकडून : जीवनातील वेदना कमी करणारे, सदैव मदतीसाठी धावून येणारे खरे मित्र जीवनाला अर्थपूर्ण करतात.
शिक्षकांकडून : जगावे कसे हे शिकवणारे, जीवनाला दिशा देणारे शिक्षक आपल्याला घडवत राहतात आणि त्यांच्या कृतज्ञतेखालीच आपण मोठे होत जातो. “आपल्या जगण्याने इतरांना हेवा वाटावा असे जगावे,” असा प्रेरणादायी संदेश देत त्यांनी व्याख्यानाचा समारोप केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रसायनशास्त्र संकुलाच्या संचालिका डॉ. संगीता माकोणे यांनी केले.



















