सोलापूर – चार दशकांपूर्वी जेव्हा महिला घराबाहेर पडत नव्हत्या त्या प्रतिकूल परिस्थितीत महिलांना संघटित करून हिंदूत्वाच्या कार्य प्रवाहात त्यांना सक्रिय करुन महिलांमध्ये हिंदू संघटन विचार रुजविण्यासाठी पहिल्या महिला कारसेविका व विश्व हिंदू परिषदेच्या पहिल्या महिला जिल्हा संघटन मंत्री स्व.प्रभाताई सारोळकर यांचे कार्य अलौकिक आहे.तेव्हा त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी युवती व महिलांनी सक्रिय होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्र संघटन मंत्री अनिरुद्ध पंडित यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक स्व.बापूराव सारोळर यांच्या धर्मपत्नी प्रभावती सारोळकर यांचे नुकतेच निधन झाले.त्यानिमित्त विश्व हिंदू परिषद व संघ परिवाराच्या वतीने शिवस्मारक सभागृहात श्रध्दांजली सभेचे आयोजन केले होते.त्यावेळी ते बोलत होते.विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा.गजानन धरणे, सहमंत्री नितीन वाटकर, जिल्हा अध्यक्ष डोंगरे महाराज, संघाचे जिल्हा कार्यवाह ऋषिकेश कुलकर्णी विचार पीठावर उपस्थित होते.
अपूर्वा सारोळकर,सेवावर्धिनीच्या चंद्रिका चौहान, राष्ट्रसेवा समितीच्या माधवी कुलकर्णी, उत्तर सोलापूर तालुका संघ चालक चंद्रकांत गडेकर,धर्माचार्य प्रांत सहप्रमुख नागनाथ बोंगर्गे, भारतीय संघाचे सचिव सुधांशु रानडे, सोलापूर जनता सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष महादेव न्हावकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संजय जमादार, ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज, ऋषिकेश कुलकर्णी, डोंगरे महाराज यांनी श्रद्धांजलीपर भाषणे केली. विश्व हिंदू परिषद गोसंवर्धन आयामाचे जिल्हा प्रमुख अमित सारोळकर, विहिंपचे पश्चिम महाराष्ट्र विभाग सहप्रमुख विजयकुमार पिसे, जिल्हा सहमंत्री विष्णू जगताप उपस्थित होते.
सारोळकर पती पत्नींनी त्यांचे सारे आयुष्य संघ कार्याला वाहून घेतल्याचे सांगून पंडित पुढे म्हणाले,सारोळकर यांचे घर म्हणजे संघाचे कार्यालय होते.संघ प्रचारक व स्वयंसेवकांना प्रभावती ताईंनी आईची माया दिली. दोघांनी संघ कार्यासाठी समर्पित केलेले जीवन निश्चित प्रेरणादायी आहे.पत्रकार दत्ता मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले.
मरणोत्तर देहदान
स्व.बापूराव सारोळकर यांनी मरणोत्तर देहदान केले.स्व.प्रभावती सारोळकर यांनीही मरणोत्तर देहदान केले.
राष्ट्रीय शौर्य विभागाच्या प्रमुख संगीता जाधव यांनी दुबई येथून मोबाईलवर पाठविलेले श्रध्दांजलीपर भाषण वाचून दाखविले.तेव्हा उपस्थितांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते.



























