सोलापूर – आजच्या धावपळीच्या युगात आणि सोशल मीडियाच्या प्रभावाखाली वावरताना तरुणाईने आकर्षण, मैत्री आणि प्रेम यातील फरक ओळखून आयुष्याची दिशा निश्चित करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने, ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधून गांधी नाथा रंगजी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज विशाखा समिती येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या श्रीमती मधुरा सलवारू यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्यावेळी होमिओपॅथी कॉलेजचे प्राचार्य डॉ श्रीधर पाटील, डॉ मनीषा अंधळगावकर, डॉ वैशाली सर्वदे, डॉ वैशाली सुरवसे, डॉ रेवती कांबळे , फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. गजेंद्र लाड यांचा विशेष सहभाग होता. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक वर्गासाठी ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही शॉर्टफिल्म दाखवण्यात आली. आकर्षण, मैत्री, प्रेम, लग्न आणि लैंगिक संबंध या विषयांवर अत्यंत ओघवत्या भाषेत आणि प्रभावीपणे या फिल्मच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले. डोळस दृष्टिकोन ठेऊन केवळ भावनांच्या आहारी न जाता बुद्धीने आणि डोळसपणे वागल्यास आयुष्याला योग्य अर्थ प्राप्त होतो, हा संदेश देण्यात आला.
चुकीच्या निर्णयामुळे होणारा पश्चात्ताप टाळण्यासाठी कोणत्या मुद्द्यांच्या आधारे विचार करावा, याचे विवेचन करण्यात आले.
नात्यांची समज: मैत्री आणि आकर्षण यातील पुसट रेषा ओळखून स्वतःचे व्यक्तिमत्व कसे घडवावे, याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.
या फिल्मने विद्यार्थ्यांच्या आणि उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घातले असून, अनेक क्लिष्ट विषयांवर विचार करण्यास प्रवृत्त केले. “ही फिल्म आमच्या आयुष्यासाठी दिशादर्शक ठरेल,” अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे

























