हदगाव / नांदेड – हदगाव तालुक्यात एकूण १२५ ग्रामपंचायत संख्या आहेत ज्यात ग्रामसेवक संख्या १०८ असल्याकारणाने नेमून दिलेल्या गावात ग्रामसेवक हजर राहत नसल्याने सर्व सामान्य जनतेची कामे वेळेवर होत नसल्याची तक्रार मोठ्या प्रमाणावर होत असल्याने याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
हदगाव तालुक्यातील अनेक ग्रामसेवक कर्मचारी हे हदगाव शहरात बसून कारभार पाहत आहेत तर काही ग्रामसेवक हे जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असल्याची दबक्या आवाजात नागरिकांमधून चर्चा होत आहे. मुख्यालय राहत नाही परिणामी ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य नागरिकांसमोर अनेक समस्या निर्माण होत आहेत. नमुना नंबर ८, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र सह विविध प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सामान्य जनतेला हदगावला यावे लागत आहे. सदरील ग्रामसेवक हे नेमून दिलेल्या गावात नियमित येत नसल्यामुळे अनेकांना तर आपला गावचा ग्रामसेवक कोण आहे? याची विचारणा करावी लागत आहे. संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. हदगाव पंचायत समितीला आठवड्यातून एक वेळा ग्रामसेवक कर्मचारी आढळून येतात दौऱ्याच्या नावाखाली वैयक्तिक कामाकडे अधिक लक्ष देत असल्याचे दिसून येते.
एका ग्रामसेवकाकडे अधिक ग्रामपंचायतचे प्रभार असल्याने कामानिमित्त फोन लावल्यास उडवा उडवीचे उत्तरे भेटतात विविध योजनेची माहिती ग्रामसेवकाकडून गावातल्या नागरिकांपर्यंत मिळत नसल्यामुळे विविध योजना पासून सामान्य नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. संबंधित गट विकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे आर्थिक हितसंबंध असल्यानेच ग्रामसेवक आपल्या मर्जीनुसार सेवा बजावत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून कामचुकार ग्रामसेवकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांमधून होत आहे.

















