वेळापूर – जनतेच्या आरोग्यसेवेसाठी उभारलेले वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्र आज स्वतःच काटेरी झुडपांच्या विळख्यात सापडले आहे या परिसरात सर्वत्र वाढलेली झुडपे, काटे आणि रानटी गवतामुळे रुग्ण व कर्मचारी यांना केंद्रात ये-जा करणेही कठीण झाले आहे.
या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.
त्यांनी सांगितले की, “आरोग्य केंद्र परिसरातील काटेरी झुडपे त्वरित हटवून स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, अन्यथा नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो.”
वेळापूर–सांगोला रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे रुग्णालयात प्रवेश करणे धोकादायक ठरत असल्याने पूर्वीचे पर्यायी गेट खुले करावे, अशी मागणीही सरतापे यांनी केली आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालय किंवा ट्रॉमा केअर सेंटर मध्ये रूपांतर व्हावे यासाठी सततचा पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.परंतु अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सरतापे यांनी आगामी काळात व्यापक आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
– मिलिंद सरतापे
तालुकाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), माळशिरस तालुका
——————————————























