लोकसभा निवडणुका ताेंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 फेब्रुवारी रोजी पुण्यात येण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात मोदी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होणार आहेत. पुणे एअरपोर्ट टर्मिनल आणि मेट्रोच्या मार्गिकेचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.
लोकसभा निवडणुका फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडयात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारकडुन विकास कामांचे उद्घाटन आणि भुमिपूजनाचा धडका सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मागील दोन महिन्यात महाराष्ट्रात मुंबई, नाशिक आणि सोलापूरनंतर पुण्यातला चौथा दौरा आहे. मुंबईत अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आलं. मुंबईतील ”न्हावा-शेवा अटल सेतू”चा लोकार्पण सोहळा मोदींच्या हस्ते पार पडला. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक इथं आयोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवालाही हजर राहिले होते. त्यानंतर सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते.
यावेळी त्यांच्या हस्ते 15 हजार घरकुलांचं लोकार्पण करण्यात आलं होतं. त्यानंतर आता 19 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येण्याची शक्यता आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंती असल्याने पंतप्रधान मोदी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होणार आहे. पुण्यातील विमानतळाच्या टर्मिनलचे उद्घाटन आणि मेट्रो मार्गिकेचेही उद्घाटन ही मोदीच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १ ऑगस्ट २०२३ रोजी लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी विविध प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले होते.