नांदेड – नांदेड दक्षिण भागातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे अनेक शेतकरी बाधित झाले असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांनी यशस्वी मध्यस्ती केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बंद पाडलेले समृद्धी महामार्गाचे काम आता पुन्हा सुरू होणार आहे.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नांदेड दक्षिण भागातून जात असून या महामार्गामुळे अनेक शेतकरी बाधित झाले आहेत. शेतकऱ्यांना योग्य मावेजा मिळाला नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले होते . शिवाय आपल्या विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा या भागातील शेतकऱ्यांनी घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांनी आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासोबत बैठक घेतली .
या बैठकीत शेतकऱ्यांचा मावेजा यासह बाजारभावाप्रमाणे जमिनीची एक समिती नेमून मूल्यांकन करून सहानुग्रह अनुदान स्वरूपात मावेजा देण्यात यावा, अवार्ड मध्ये राहिलेले १२ टक्के व्याज देण्यात यावे. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी ५० फुटाचा सर्विस रोड देण्यात यावा . शिवरस्ते , पांदन रस्त्यावर पूल बांधण्यात यावे. नैसर्गिक प्रवाह प्रमाणे पावसाच्या पाण्याची व्यवस्था करणे किंवा ड्रेनेज व्यवस्था करण्यासाठी डी पी आर मध्ये बदल करून काम करण्यात यावे .
१२ फेब्रुवारी २०२४ रोजी चे शासनाने मागवलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अहवालावर शासन स्तरावर निर्णय घेणे , पुनश्च कार्यवाही करण्यात यावी दिनांक 5 जुलै २०२४ च्या महसूल मंत्री यांच्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी करणे , दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ च्या जिल्हाधिकारी यांच्या बैठकीतील इतिवृत्तांतील मुद्द्यांची अंमलबजावणी करण्यात यावी , दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी च्या जिल्हाधिकारी यांच्या बैठकीतील इतिवृत्तातील मुद्द्यांची अंमलबजावणी करण्यात यावी यासह अनेक बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत जिल्हा प्रशासनाने आणि संबंधित विभागाने सकारात्मक पाऊल उचलावे अशा सूचना आ. बोंढारकर यांनी दिल्या. अखेर काही बाबतीमध्ये समेट घडून आणण्यात यश आले असून शेतकऱ्यांनी रोखलेले काम आता पुन्हा सुरू होईल अशी माहिती यावेळी देण्यात आली . या बैठकीस उपस्थित जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, शेतकरी कृती समितीचे प्रमुख समन्वयक दादाराव हंबर्डे, समन्वयक अशोक मोरे,मुजीब सेठ,संतोष मस्के,माधव कदम यांच्यासह शेकडो शेतकरी होते..




















