पंढरपूर – श्री क्षेत्र पंढरपूर येथे अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा मोठी आहे. येथील रसिक मंडळाने सुरुवात केलेली संगीत सेवेची ही परंपरा पंढरपूर येथील स्वरसाधना या संस्थेने अखंड पस्तीस वर्ष सांभाळीत अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचे संस्कार सर्व पंढरपूर कलारसिक श्रोत्यांना दिल्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आवर्जून सांगितले.
येथील स्वरसाधना मंडळाचे सदस्य प्रदीप भडगांवकर यांनी लिहिलेल्या आठवणींच्या गंधकोशी या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम नुकताच येथे संपन्न झाला. या पुस्तकाचे त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर येथील ज्येष्ठ गायक दिलीप टोमके, प्रदीप भडगावकर, विलास भडगांवकर, अरुण भडगांवकर, सीमा भडगांवकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविका मध्ये प्रदीप भडगांवकर यांनी सांगितले की संगीत सेवा हीच खरी सेवा आहे आणि याच सेवेमुळे अनेक दिग्गज कलाकारांची कला आपणाला जवळुन अनुभवता आली. संगीत सेवेमुळेच ज्येष्ठ कलाकारांची सेवा करण्याचे देखील भाग्य मला मिळाले आणि त्या आठवणी कायम रसिकांच्या मनात उर्जा देत रहाव्यात याच भुमिकेतून हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना प्रशांत परिचारक म्हणाले, भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत हा प्रत्येक गाण्यांचा मूळ पाया आहे. साहित्य आणि कला यावरून शहराची खरी श्रीमंती कळते. स्वरसाधनेच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या संगीत मैफीलीतून अनेक दिग्गज कलाकारांनी पंढरपूरला येऊन विठुरायाचा आशीर्वाद घेत आपली कला सादर केली. संगीत क्षेत्रातील या बड्या कलाकारांचे संगीत संस्कार आपल्या या पंढरी नगरीमध्ये रुजलेले आहेत.
त्यामुळे पंढरपूरकरांच्या दृष्टीने ही खरोखरच खुप मोठी गोष्ट असून ही परंपरा कायम रहावी यासाठी पुढील काळात कलाक्षेत्रातील स्थानिक तरुण मंडळींनी निश्चित पुढाकार घ्यावा. त्यांच्या पाठीशी कायमच आपले पाठबळ राहिल असे आश्वासन देत तरुण मंडळींनी ही परंपरा जपावी असे आवर्जुन सांगत पडद्यामागील कलाकारांचे अनुभव हे अतिशय प्रेरणादायी असतात आणि ते अनुभव प्रदीप भडगांवकर यांनी आपल्या लेखनातून पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले असल्याचे सांगत या पस्तीस वर्षांच्या काळातील अनेक जुन्या आठवणींचा ठेवा देखील त्यांनी उलगडत या पुस्तक प्रकाशनास शुभेच्छा देत त्यांनी अभिनंदन देखील केले. यावेळी यावेळी प्रदीप भडगांवकर आणि सीमा भडगांवकर यांचा सत्कारही त्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ज्ञानेश्वर दुधाने, मिलिंद परिचारक, ज्येष्ठ कलाकार दिलीप टोमके यांनी आपली मनोगते व्यक्त करताना आठवणींचा गंधकोश हा आठवणींचा ठेवा पंढरपूर कला रसिक श्रोत्यांसाठी एक ऊर्जादायी आणि प्रेरणादायी ठरेल असे सांगत त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तुकाराम चिंचणीकर यांनी केले. यावेळी भडगांवकर परिवारावर प्रेम करणारे रसिकश्रोते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रदीप भडगांवकर यांचा सत्कार करत अनेकांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण ताठे, प्रतिक भडगांवकर, अजीत माने यांनी अधिक परिश्रम घेतले.





















