बार्शी – ‘नैसर्गिक सौंदर्याचे स्वाभाविक वर्णन, मानवी जीवनाच्या विविध भावछटा, ग्रामीण जीवनाची यथार्थ वास्तवता सर्व कथांचे उत्तरार्धात लीलयाने मानवतावादी उदात्तीकरण, हे आबासाहेबांच्या सर्व कथांचे स्वाभाविक वैशिष्ट्य आहे’, असे प्रतिपादन साहित्यिक, संत वाङमयाचे अभ्यासक दत्ता गोसावी यांनी आबासाहेब घावटे लिखित “लावण्या ” या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा बार्शी व कवी कालिदास मंडळ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “लावण्या” या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी बार्शी शाखेचे अध्यक्ष पां.न. निपाणीकर हे होते.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य चंद्रहंस गंभीर, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे, मातृभूमी प्रतिष्ठानचे सचिव प्रतापराव जगदाळे हे प्रमुख उपस्थित म्हणून तसेच सत्कारमूर्ती आबासाहेब घावटे व सौ.जयश्री घावटे हे व्यासपीठावर विराजमान होते.
पुढे बोलताना दत्ता गोसावी म्हणाले की, आबासाहेब घावटे हे अष्टपैलू लेखक, कवी आणि बालकथा लेखक आहेत. त्यांच्या साहित्यामध्ये स्वाभाविकपणे संस्करण आहे.
संत तुकारामांच्या अनेक ओव्यांचा संदर्भ देउन कथा संग्रहाच्या श्रेष्ठत्वाची तुलना केली.
या प्रकाशन समारंभात कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमात अशोक खुळे, प्रताप जगदाळे, चंद्रहंस गंभीर या मान्यवरांची समायोजित भाषणे झाली.
अध्यक्षीय भाषणात पांडुरंग निपाणीकर म्हणाले की, घावटे यांचे साहित्य, समाज मनाचे वास्तव प्रतिबिंब आहे, तसेच ग्रामीण स्त्री जीवनाचे विविध भाव पैलू समर्पकपणे चित्रीत करणारे उत्कृष्ट साहित्य आहे.
भारतीय तरुण साहित्य आणि समाजसेवा यामध्ये अल्प संख्येने दिसून येतो, तरुणांनी साहित्य आणि समाजसेवा यामध्ये आघाडीवर असले पाहिजे, असे मत व्यक्त केले. प्रा.डॉ. रविराज फुरडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी किरण विभुते यांनी केले. या कार्यक्रमास साहित्यिक, पत्रकार, रसिक, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा प्रकाशन समारंभ यशस्वी करण्यासाठी आनंद घावटे, सौ.जयश्री घावटे, नितीन गायकवाड, बी. आर. देशमुख, प्रकाश गव्हाणे, सौ.सुमन चंद्रशेखर, कल्याण घळके, शारदा पानगावकर, श्रीमंत चौरे, ज्ञानेश्वर देवराम, आप्पासाहेब भोंग, यांनी परिश्रम घेतले.


















