वेळापूर – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) माळशिरस तालुका यांच्यावतीने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि सामाजिक सुविधांशी संबंधित विविध महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना नातेपुते येथे सादर करण्यात आले.
यावेळी पक्षाने अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विना अट जाहीर केलेली आर्थिक मदत तात्काळ खात्यात जमा करावी, तसेच राज्यभरातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी ठाम मागणी केली.
याशिवाय माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर, लवंग सेक्शन, डी-19, महाळुंग, जांबुड आदी गावांतील प्रलंबित गावठाणा प्रश्न तातडीने मार्गी लावावा.
तसेच महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळासह सर्व मागासवर्ग महामंडळाची कर्जे माफ करावीत.
अकलूज येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहाच्या जागा व इमारतीचा प्रलंबित प्रश्न सोडवून स्वतंत्र मुलांचे व मुलींचे वस्तीगृह उभारावेत.
वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे.
वेळापूर येथे नवीन बसस्थानक तात्काळ मंजूर करावे
तसेच तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील माळीनगर उड्डाणपूल, बोंडले आणि बावडा परिसरातील प्रलंबित असलेली कामे पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली.
याप्रसंगी माजी आमदार राम सातपुते, तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले, युवक राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे, प.महा. संघटक एस. एम. गायकवाड, तालुका सरचिटणीस मारुती खांडेकर, युवक तालुका अध्यक्ष दशरथ नवगिरे, राम कांबळे, महेंद्र लोंढे, विनोद रणदिवे, बादल सोरटे, स्वप्निल सरवदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




















