पंढरपूर – विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ।। विठ्ठल सुखा विठ्ठल दु:खा । तुक्या मुखा विठ्ठल ।। या संत वचना प्रमाणे कार्तिकी एकादशीच्या अनुप्यम्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या कानाकोऱ्यातून तसेच शेजारील कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेशा मधून रेल्वे, एसटी तसेच खासगी वाहनांमधून मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल होवु लागले आहेत. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे पाच ते सहा तासांचा कालावधी लागत आहे. यावर्षी राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस तसेच पूरपूरिस्थी निर्माण झालेली होती. विशेष म्हणजे अजूनही काही भागात पाऊस सुरुच आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांबरोबरच पावसाचा शहरातील नागरिकांना देखील मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे यावर्षी कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या खूपच रोडावल्याचे दिसत आहे.
कार्तिकी एकादशीचा सोहळा याचि देही याची डोळा अनुभविण्यासाठी शनिवारी नवमीच्या दिवशी मोठ्या संख्येने येथे भाविक दाखल होवू लागलेले आहेत. भाविकांच्या गर्दीमुळे पंढरीनगरी फूलून गेलेली आहे. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल आणि सावळ्या विठुनामाच्या जयघोषामुळे पुण्यनगरी असलेली पंढरी भक्तीरसात चिंब झालेली आहे.
शहरातील मठ, धर्मशाळा तसेच मंदिर परिसरातील चिंचोळ्या गल्लीमधील मोठ्या वाड्यांमधून आणि चंद्रभागेच्या विस्तीर्ण वाळवंटा बरोबरच पैलतिरावरील पासष्ठ एकर परिसरात वारकरी विठ्ठल भक्तीत लीन होवून भजन, कीर्तन आणि प्रवचना सारख्या कार्यक्रमातून भाविक दंग झालेले दिसत आहेत.

दरम्यान विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग तसेच शहरातील अन्य मार्गा बरोबरच प्रमुख असलेल्या स्टेशन रस्त्यावर प्रासादिक वस्तु, सोलापूर चादरी, घोंगडी, फोटोफ्रेम, देवदेवतांच्या मुर्ती अशा दुकानांमधून भाविकांची गर्दी दिसत आहे.
———————
विठ्ठल दर्शनासाठी लागता आहेत पाच ते सहा तास –
पदस्पर्श दर्शना बरोबरच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने विठ्ठलाच्या मुखदर्शनाची देखील चांगली व्यवस्था केलेली आहे. येथील गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेड मधील चार ते पाच गाळे दुपारी भरल्याचे दिसत होते. त्यामुळे विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी भाविकांना पाच ते सहा तासांचा कालावधी लागत आहे.
———————-
उड्डाणपुला मुळे मुखदर्शन रांगेत सुसुत्रता –
मुखदर्शनाच्या रांगेत देखील सुसुत्रता यावी यासाठी मंदिर समितीच्या वतीने शहरातील संभाजी चौक परिसरात लोखंडी उड्डाणपुल उभारण्यात आलेला आहे. या उड्डाणपुलामुळे प्रदक्षिणा रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या भाविकांना मुखदर्शन रांगेचा त्रास जाणवत नाही. या बरोबरच मुखदर्शनाच्या रांगेत विस्कळीतपणा न येता दर्शन रांगेत सुसुत्रता राहिल या बाबतची काळजी मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आलेली दिसत आहे.
———————
शहराला पोलिसी छावणीचे स्वरुप –
शहरातील चंद्रभागा वाळवंट, पासष्ठ एकर परिसर, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, पदस्पर्श दर्शन रांग, गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेड आदी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. या वर्षी देखील जिल्हा पोलिस प्रमुखांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तिर्थक्षेत्र पोलिसिंग उपक्रमा अंतर्गत शहरात चार ते पाच ठिकाणी मदत केंद्रांचे टेंट लावण्यात आलेले आहेत. या केंद्रामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या पोलिसांकडून तसेच पोलिस मित्रांकडून वारकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
———————————–
यात्रेतील भाविकांची संख्या रोडावली –
कार्तिकी यात्रेसाठी राज्याच्या विविध भागांसह विशेषत: कोकण, मुंबई या भागातून वारकरी मोठ्या संख्येने येथे येत असतात. मात्र यावर्षी परतीच्या पावसाने मुंबई,कोकणासह राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर धुमाकुळ घातला. त्यामुळे अनेक भागात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्याचा देखील फटका वारकरी यात्रेसाठी येण्यावर झाल्याचे जाणवत आहे.
—————————————
पंढरपूर : कार्तिक यात्रे निमित्त शनिवारी येथील चंद्रभागा स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याने चंद्रभागा वाळवंट भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेल्याचे दिसत होते.

















