सोलापूर – वारकरी परंपरा म्हटले की वारीची चर्चा आली त्या मधील माघ वारीतील मोठी परंपरा असून निष्ठेने केलेली पाहावयास मिळते. या वारीमध्ये तिसरे गोल रिंगण पेनूर ता. मोहोळ जि. सोलापूर येथे केले जाते. यंदाही दि. 27-01-2026 रोजी स. 10.00 वा. महात्मा गांधी प्रशाला, पेनूर ता. मोहोळ जि. सोलापूर येथे उत्साही वातावरणात पार पडले.
” पंढरीसी जारे आल्यानो संसारा | दिनाचा सोयरा पांडुरंग || ” तु. म. या संत उक्ती प्रमाणे प्रत्येक जीवाला पंढरीच्या वारीसाठी प्रवृत्त केले जाते. त्या वारीतील रिंगण सोहळा हा सर्व वारकरी भाविकांचा खूप आवडीचा विषय आहे. सर्व दिंडीतील वारकरी खूपच आनंदी व प्रसन्न दिसत होते.
भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखीचे जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष ), किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष ), नामदेव रणदिवे महाराज यांच्या हस्ते पूजन करून निळोबा जांभळे महाराज (समिती अध्यक्ष), विवेक जमदाडे (बी डी ओ), संजय पवार ( शहर अध्यक्ष ), विष्णूपंत मोरे महाराज यांच्या हस्ते अश्व पूजन करण्यात आले व रिंगण सोहळा सुरु झाला. वारकरी संप्रदायाचे भूषण असणारी पताका रिंगाणामध्ये धावू लागली. पारंपरिक सर्व रिंगण पूर्ण करून अश्व रिंगण सुरु झाले आणि मैदानातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले.
या रिंगाणाला पाहताना माऊलींच्या सोहळ्याची आठवण होत होती. सर्व दिंडी प्रमुख व विणेकरी महाराजांचा भारत चवरे महाराज यांचे हस्ते सन्मान करून पालखी सोहळा मार्गस्थ झाला. या सर्व कार्यक्रमाचे यजमान पेनूर भजनी मंडळ होते व भाविक वारकरी मंडळ हे आयोजक होते. तसेच सूत्रसंचालन व मार्गदर्शन सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष) यांनी केले. बळीराम चवरे, महेश चवरे,आबा वसेकर, इ. यांनी परिश्रम घेतले.


























