वसमत / हिंगोली : वसमत नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत जनतेने विश्वासाने निवडून दिलेले नवनिर्वाचित नगरसेवक शेख हबीब शेख बशीर यांची उपनगराध्यक्षपदी निवड होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, यामुळे शहरात राजकीय व सामाजिक वर्तुळात सकारात्मक चर्चा रंगली आहे.
शेख हबीब शेख बशीर हे गेल्या कित्येक वर्षांपासून समाजसेवेच्या क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी जात, धर्म, पंथ यांचा भेद न करता सर्वसामान्य, गोरगरीब व वंचित घटकांना न्याय देण्यासाठी सातत्याने काम केले आहे. सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन विकासाचा मार्ग निवडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी तत्पर राहणारा, कामासाठी धावपळ करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या वसमत नगरपरिषद निवडणुकीत जनतेने त्यांच्या कार्याची पोचपावती देत मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. ही निवड केवळ राजकीय विजय नसून जनतेच्या विश्वासाचा कौल असल्याचे बोलले जात आहे.
राजकीय अनुभवाबाबत बोलायचे झाले तर, शेख हबीब शेख बशीर यांनी काँग्रेस पक्षात अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. तसेच निराधार समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी प्रभावी काम केले आहे. नगरपालिकेच्या कामकाजाचा त्यांना जुना अनुभव असून प्रशासकीय बाबींमध्ये सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक प्रशासनासाठी व प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी ते उपनगराध्यक्षपदी योग्य ठरतील, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळेच “जनतेच्या मनातला उपनगराध्यक्ष” अशी ओळख मिळवणाऱ्या शेख हबीब शेख बशीर यांच्या नावाची वसमत नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा सुरू आहे.
आगामी काळात त्यांची निवड झाल्यास वसमत शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


























