तभा फ्लॅश न्यूज/सोनखेड : सोनखेड गावातील मध्यवर्ती बाजार मैदानात, अगदी पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील दानपेटीवर सोमवारी मध्यरात्री चोरट्याने धाडसी डल्ला टाकला. रात्री साधारणतः दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिराचे गेटचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला आणि दानपेटी फोडून आत असलेले अंदाजे 30 ते 40 हजार रुपये चोरून नेले.
या घटनेमुळे ग्रामस्थांत संतापाची लाट पसरली असून, पोलीस ठाण्याच्या समोरच मंदिरात चोरी होणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांनी सांगितले. चोरीचा संपूर्ण प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे कैद झाला असून, पोलिसांनी फुटेज तपासायला सुरुवात केली आहे.
घटनेची माहिती मिळताच शंकर नामदेवराव मोरे यांनी सोनखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, सोनखेड पोलीस ठाण्याच्या अवघ्या काही मीटर अंतरावर ही चोरी घडल्यामुळे पोलीस गस्त आणि सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
गावात याआधीही किरकोळ चोरीच्या घटना घडल्या असल्या तरी, मंदिरासारख्या श्रद्धास्थळी एवढ्या मोठ्या प्रमाणात दानपेटी चोरीला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या घटनेमुळे गावातील श्रद्धाळू आणि व्यापाऱ्यांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला पकडून चोरी झालेली रक्कम वसूल करावी आणि अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.