सोलापूर – आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कुणाशीही तडजोड न करता निष्ठेने काम करावे. आपली ताकद दाखवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. ही माझ्या आयुष्यातील शेवटची निवडणूक आहे, असे भावनिक उद्गार यावेळी बळिराम काका साठे यांनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत काढले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील शरद पवार राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी राजीनामे देऊन आम्ही अपक्ष जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक मोठ्या ताकदीने लढणार आहोत, अशी घोषणा ज्येष्ठ नेते बळिराम साठे यांनी केली आहे. ऐन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर काका साठेंनी बॉम्ब टाकला असून काका साठेंचे कार्यकर्ते देखील काका जसं तुम्ही म्हणाल तसं करू अशी हाक दिल्याने काकांच्या या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत एकच खळबळ माजली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दखल घेतली जात नसल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला होता. पुढील निर्णय घेण्यासाठी आयोजित समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते म्हणाले, मी यापूर्वी जिल्हा परिषदेवर सत्तेत असताना मोहिते पाटील यांच्या सहा सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली होती. याची खुन्नस धरून धैर्यशील मोहिते-पाटील हे माझ्या विरोधात षडयंत्र रचत आहेत. त्यांच्या साथीला आमदार अभिजित पाटीलही आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कामे होण्यासाठी कोणत्या पक्षात प्रवेश करायचा, हा निर्णय सध्या स्थगित ठेवला आहे. यासाठी निवडणुकीनंतर या संदर्भात निर्णय घेतला जाईल. माजी आमदार यशवंत माने यांनी माझे राजकारण संपवण्याच आमिष दाखवून कार्यकर्ते फोडण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहेत. यासाठी कार्यकर्त्यांनी सावधगिरी बाळगून आगामी निवडणुका जिंकण्यासाठी तयार व्हावे.
यावेळी सोलापूर बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश चोरेकर व प्रल्हाद काशीद यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद माने, उत्तर सोलापूर तालुका पंचायत समिती उपसभापती जितेंद्र शीलवंत आदींसह बळिराम साठे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.