लातूर / औसा – श्री संत गणेशनाथ महाराज यांच्या मध्यरात्री निघालेली नगरप्रदिक्षिणा पहाटे ५ वा. सुमारास मंदीत पोहंचली. बुधवार दि, ५ रोजी दुपारी २ वा. निघालेल्या प्रदिक्षिणा काळात लाडक्या संताचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी एकच गर्दी केली. तर सायंकाळी ४ वा. सुमारास कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जणी प्रकाश / काला वाटू एकमेका, वैष्णव निका संभ्रम या अभंगानंतर पताका उंचावला आणि गोपाळपुरात महाप्रसाद काला झाला.या महाप्रसादाची आस लावून वर्षभर वाट पाहत असलेल्या हजारो भाविकांनी हजेरी लावली.
रात्री हभप ज्ञानेश्वर महाराज आळंदी यांचे कीर्तन झाल्यानंतर भजन झाले. मध्यरात्री १२ वा. सुमारास संत गणेशनाथांची पालखी नगरप्रदिक्षेसाठी मुखी ज्ञानोबा तुकाराम चा गजराला टाळ, मृदंगाची साथ देत निघाली.सकाळच्या दर्शनानंतरही लाडक्या संताचे दर्शन दारात घेण्यासाठी सडा मारुन रंगीबेरंगी रांगोळीने सजवलेले दारात महिलासह बच्चे कंपनी रात्रभर वाट पाहत बसली होती.पालखीरथाच्या पाठीमागे राजकीय, प्रापंचिक घडामोडीतील गावकलाकारांनी सजवून साकारलेली सोंग पाहण्यासाठी भाविक भक्तांनी रस्त्याच्या दुतर्फा एकच गर्दी केली होती.
पहाटे ४ वा. सुमारास पालखी तेरणा नदीच्या काठावर आल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या फटाक्याच्या आतिषबाजीत ढगाळलेले आभाळही पांढरेशुभ्र लखलखत होते. तर आवाजाचे तेरणेचा परिसर पार दणाणून गेला होता.
आज दुपारी २ वा. गणेशनाथांची पालखी गेली ८२ वर्षाचा वारसा असलेला दगडी चाकांचा महाप्रसादाचा रथ घेऊन निघाली. ४ वाजता बाजारचौकात गणेशनाथांचा काल्याचा महाअभंग झाला. चोपदारांनी पताका उंचावून इशारा करताच गोपाळपुर व हनुमान मंदीरावरून महाप्रसाद काला वाटण्यात आला.गेल्या वर्षभरापासून या महाप्रसादाची वाट पाहत असलेल्या उपस्थित भाविकांनी महाप्रसाद मिळून आपले सार्थक व्हावे. यासाठी छत्र्या उलट्या करुन हात उंचावले. तर महिलांनी पदर पसरुन महाप्रसाद घेतला.
महाआरती नंतर नाथांची पालखी पुन्हा मंदीराकडे निघाली. महिलांनी दारात सडा मारुन अद्वितीय रांगोळी काढून त्यावर फुलांच्या पाकळ्याने दारासह रस्ते सजविले.आणि नाथबाबांचे दर्शन घेतले.




















