बार्शी – बकीमचंद्र चटोपाध्याय लिखित ऐतिहासिक “वंदे मातरम” गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या माध्यमातून राज्यातील ३५८ तालुक्यामध्ये एकत्रितपणे समूह गायन करुन सार्ध शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बार्शीमध्ये संत विसोबा खेचर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बार्शी आयोजित, तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या अध्यक्षतेखाली भगवंत मैदान येथे आनंदोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाप्रसंगी सर्व उपस्थितांनी वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन केले. समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार एफ. आर. शेख यांनी वंदे मातरम गीताला उद्देशून ऐतिहासिक गीताचा अभिमान आणि शौर्य याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. तर प्रा. किरणकुमार खर्डेकर यांनी वंदे मातरम गीताची रचना, इतिहास, क्रांतिकारी चवळीतील गीताचे महत्व आणि गीताचा अर्थ याचे विश्लेषण करत मार्गदर्शन केले. तसेच वंदे मातरम गीताचे महत्व अधोरेखित करत संत विसोबा खेचर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी लघु नाटीकेचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
संत विसोबा खेचर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बार्शीचे प्राचार्य प्रदीप हरिदास यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध शाळांतील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तसेच बार्शी शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी, बार्शी नगरपरिषद, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, अग्निशमन दल, रुग्णवाहीका, पत्रकार, विविध सामाजिक संघटना तसेच बार्शीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी समितीचे अध्यक्ष तथा बार्शी तहसीलदार एफ. आर. शेख, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय पुणे चे निरीक्षक किशोर उबाळे, संत विसोबा खेचर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बार्शीचे प्राचार्य प्रदीप हरिदास, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, प्रा. किरणकुमार खर्डेकर, जयकुमार शितोळे, अजित कुंकूलोळ, प्रा. संजय पाटील, गणेश स्वामी, सुमन चंद्रशेखर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थ्यांना उद्योजक गौतम कांकरिया यांच्यावतीने खाऊचे वाटप करण्यात आले तर दिलीप सोमाणी यांच्यावतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रदीप हरिदास यांनी केले. सूत्रसंचालन माणिक आडुरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार बसवराज मोटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
























