विजयपूर – एका कुटुंबातील बहीण, भाऊ आणि पुतण्याचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी शिरोळ रस्त्याजवळील आलमट्टी डाव्या कालव्यात घडली आहे
मृतांमध्ये बसम्मा चिन्नप्पा कोन्नूर (वय २०), तिचा भाऊ संतोष चिन्नप्पा कोन्नूर (वय १८) आणि पुतण्या रवी हनमंत कोन्नूर (वय १७) यांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या शोधमोहीमेनंतर संतोषचा मृतदेह संध्याकाळी सापडला, तर उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बसम्मा कपडे धुण्यासाठी कालव्याजवळ गेली असता ती पाण्यात घसरून पडली. हे पाहून तिचा भाऊ संतोष तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना त्यांना वाचवण्यासाठी पुतण्या रवी देखील उडी मारला. मात्र तीव्र प्रवाह आणि खोल पाण्यामुळे तिघेही वर येऊ शकले नाहीत, असे प्रत्यक्षदर्शी रूपा (बसम्माची वहिनी) आणि हणमव्वा (बसम्माची बहीण) यांनी सांगितले.

माहिती मिळताच घटनास्थळी सीपीआय महमूद फसियुद्दीन आणि पीएसआय संजय तिप्परड्डी यांनी भेट देऊन पाहणी केली. आलमट्टी केबीजेएनएल अधिकाऱ्यांना पाण्याचा प्रवाह थांबवण्याचे निर्देश दिले. अग्निशमन दलाच्या प्रभारी अधिकारी बसवराज बिरादार यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या कर्मचाऱ्यांनी उर्वरित दोघांचा शोध सुरू ठेवला आहे.
घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश उसळला होता. मुद्धेबिहाळ पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
*माजी आमदार ऐ.एस.पाटील नडहळ्ली यांच्याकडून आर्थिक मदत*
घटनेची माहिती मिळताच भाजपा शेतकरी मोर्चाचे राज्याध्यक्ष व माजी आमदार ए. एस. पाटील नडहळ्ली घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना धीर दिला व घटनेची माहिती घेतली. त्यांनी वैयक्तिक एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे वचन दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून प्रत्येक मृताला ५ लाख रुपयांची शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
ते म्हणाले की, हे कुटुंब अत्यंत गरीब असून, मागील २५ वर्षांपासून शिरोळ रस्त्यावरील आश्रय कॉलनीत राहत आहे. कुटुंब चिंद्या गोळा करून व छोट्या-मोठ्या कामांतून उदरनिर्वाह करते. आता तरुण मुलांना गमावल्याने हे कुटुंब अत्यंत दुःखात आहे. जिल्हा व तालुका प्रशासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली
तसेच त्यांनी सांगितले की, कालव्यांत घसरून होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांवर आळा घालण्यासाठी कालव्याच्या पूल व वळणांवर संरक्षण भिंती व सुरक्षाव्यवस्था उभाराव्यात यावे आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी.
बसम्माचे विवाह ठरला होता
बसम्मा ही पदवीधर होती. ती सुरेश चिन्णण्ण मुग्गोल या युवकावर गेली दोन वर्षांपासून प्रेम करत होती. एकदा दोघे घरातून पळून गेले होते, त्यावेळी बागलकोट जिल्ह्यातील रांपूर पोलीस ठाण्यात प्रकरण नोंदवले गेले होते. दोघांना शोधून मुद्देबिहाळ पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांनी लग्न करण्याची लेखी संमती दिली होती. पुढील महिन्यात दोघांचे लग्न होणार होते**, पण बसम्माच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.




















