त.. भा. प्रतिनिधी,
वाळूज महानगर : पहाटे ३:०० वाजता अचानकच पोलीस आयुक्त प्रविण पवार यांच्या मोबाईलवर पंजाब पोलिसांच्या AGTF चे ADG प्रमोद बान यांचा फोन आला. त्यांना गंभीर आणि तातडीची मदत हवी होती … तातडीने त्यांनी संभाजीनगर पोलिसांना तयार राहण्याचा संदेश देत कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार धडाकेबाज व थरारक कारवाई करत फीरोजपूर, पंजाब येथील तिहेरी हत्याकांडातील सात आरोपींना ताब्यात घेतले.
राज्याला हादरवून सोडणाऱ्या फीरोजपूर, पंजाब येथील एका तरुण महिलेची, जिचे लग्न अवघ्या काही दिवसांवर आले होते, निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. शस्त्रांनी सुसज्ज असलेले हे आरोपी वाऱ्याच्या वेगाने इनोव्हा क्रमांक MH26AC5599 मधून महाराष्ट्रात पळत होते. पंजाब पोलिस ‘त्या’ गाडीच्या मागावर होतेच त्याची इत्यंभूत माहिती संभाजीनगर पोलिसांना मिळाली होती. त्या माहिती आधारे समृद्धी महामार्गावरून पळणाऱ्या त्या गाडीला सकाळी ५:४५ वाजता छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे व सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांवगी जवळील पुलाजवळील वाहतूक पोलिसांना माहिती देत मार्गदर्शन केले.
त्यानुसार अपघाताचा प्रसंग उभा करण्यात आला पोलिसांच्या चक्रव्यूहात पळून जाणारे आरोपी अडकवले आणि याच संधीचा फायदा घेत अत्यंत धाडसी योजना आखून गुन्हे शाखेचे संदीप गुरमे आणि पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखालील १० अधिकाऱ्यांच्या आणि ४० कर्मचाऱ्यांच्या टीमने, QRT सह सज्ज होऊन, आरोपींना शस्त्रांनी सुसज्ज असतानाही घेरले. गोळ्या कधीही सुटू शकल्या असत्या, पण बुलेटप्रूफ जॅकेट्समध्ये सज्ज जवानांनी जणू एक रणांगणच सजवलं होतं , पोलिस अत्यंत दक्ष होते , थोडी जरी चूक झाली असती तर गोळयांचा पाऊस पडला असता. परंतु पोलिसांनी आखलेले चक्रव्यूह खूप मजबूत होते. जे भेदणे कुख्यात गुन्हेगारांना शक्य नव्हते.
ही कारवाई जणू एखाद्या चित्रपटातली थरारक घटना वाटावी अशीच होती—श्वास रोखून धरावा लागेल अशी ती धाडसी मोहीम मिळालेल्या माहितीने ही लढाई जिंकली, आणि पोलिसांनी सातही आरोपींना पळ काढण्याआधीच ताब्यात घेतले.
आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात पत्रकार परिषद घेत सर्व टिमचे अभिनंदन केले व सर्व टिमला योग्य बक्षीस देण्याची घोषणा करत पंजाब पोलिस आमच्याशी सातत्याने संपर्कात आहेत, आणि आरोपींना आज सायंकाळी त्यांच्या ताब्यात दिले जाईल असे सांगितले.