सोलापूर — सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथील विद्यार्थ्यांची एकदिवसीय शैक्षणिक व मनोरंजनात्मक सहल टिल्लूज कृषी पर्यटन क्षेत्र येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सहलीचा उद्देश विद्यार्थ्यांना कृषी पर्यटनाची प्रत्यक्ष ओळख करून देणे, सामाजिक जाणीव विकसित करणे तसेच नैसर्गिक वातावरणाचा अनुभव देणे हा होता. सहली दरम्यान विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. नाश्त्यानंतर परिसरातील विविध वृक्ष, पिके व ग्रामीण जीवनशैलीची माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी झोका, बैलगाडी सफर, पर्णकुटी दर्शन तसेच विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेत मनमुराद आनंद लुटला. यानंतर कार्यक्रमास नॅब संस्थेचे उपाध्यक्ष अंकुश कदम तसेच कार्यशाळेचे अधिक्षक रामचंद्र कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच रियाज मुल्ला व आकांक्षा भंडारे यांची उपस्थितीही लाभली. टिल्लूज कृषी पर्यटन क्षेत्राच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी हुरडा पार्टी व पंचपक्वान्नांचा रुचकर भोजनाचा आस्वाद देण्यात आला. परतीच्या प्रवासाला होटगी रोडवरील साईबाबा मंदिराला भेट देऊन दर्शन घेण्यात आले. हा उपक्रम सामाजिक बांधिलकी व संवेदनशीलतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरला.
यावेळी शिवराज थ्वंटे व दत्ता मुजमुले यांच्या वाढदिवसानिमित्त अधिक्षक रामचंद्र कुलकर्णी सर यांच्या हस्ते सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला. सदर सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी भागीरथी नाईकवाडे, संजय कलाल, संदेश कांबळे व शुभम वांझरे, अमृता घुगरे मावशी यांचे विशेष सहकार्य लाभले. संपूर्ण दिवस आनंद, उत्साह व सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण ठरला. “आज आम्हाला खूप काही शिकायला आणि अनुभवायला मिळाले”, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. ही एकदिवसीय सहल विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक, शैक्षणिक व प्रेरणादायी ठरली असून त्यांच्या आयुष्यात आनंद व आत्मविश्वासाची नवी उभारी देणारी ठरली.

























