सोलापूर – दिव्यांगाच्या २०२७ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक क्रिकेट स्पर्धेत भारत देशाचे प्रतिनिधित्व करून विजेतेपद मिळवण्याचे माझे पुढील ध्येय असल्याचे भारतीय विश्वविजेते दिव्यांग महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार गंगा संभाजी कदम बोलत होती.
श्रीलंकेतील कोलंबो येथे नुकत्याच झालेल्या दिव्यांगाच्या (अंध) पहिल्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने नेपाळला सात गडी राखून नमवित विजेतेपद पटकाविले. या संघात महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू गंगा कदम ही होती. यावेळी गंगाचे सोलापूर विमानतळावर शानदार स्वागत करण्यात आले.

विमानतळाच्या प्रवेशद्वारावर बहिरगुंडे या महिलेने रांगोळी काढली होती. दुपारी एक वाजल्यापासून रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ संचलित भैरूरतन दमाणी अंधशाळेचे ५० विद्यार्थी तिच्या स्वागतासाठी सज्ज होते. सोलापूर विमानतळावर २.४५ वाजता तिचे आगमन झाल्यानंतर गुलाब पाकळ्याच्या वर्षाव करुन तिचे शानदार स्वागत करण्यात आले.
दमाणी अंधशाळेचे बँड पथक तसेच पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरचे बँड पथक प्रमुख अंकुश ठोसर यांच्या मार्गदर्शनाखाली बँड पथकानेही तिचे स्वागत केले.

यावेळी अंधशाळेचे माजी विद्यार्थीही मुंबई व पुण्याहून तिच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. यावेळी लुई ब्रेन संस्था, विश्व हिंदू परिषद व जगदंबा प्रतिष्ठान, सोलापूर शहर पोलीस, पिंटू डीजे यांनीही तिचे स्वागत केले.
यावेळी दमाणी अंधशाळेचे सचिव संतोष भंडारी, अध्यक्ष संतोष सपकाळ, मुख्याध्यापक प्रकाश दर्शनाळे, उद्योजक केतन शहा, गंगाचे प्रशिक्षक राज शेळके आदी उपस्थित होते. यावेळी अन्नपूर्णा, मिष्टी मिठाईचे वाटप केले.

——
पंतप्रधान, राष्ट्रपतीची भेट आमचे भाग्य
गंगा म्हणाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची भेट होईल, असे मला स्वप्नातही वाटले नाही. परंतु विश्वविजेतेपद मिळाल्यामुळे आम्हाला त्यांची भेट मिळाली हे आमचे भाग्य आहे. प्रशिक्षकांनी टीप दिली होती की पहिल्या सामन्यात यश मिळाले की शेवटपर्यंत हे यश मिळत जाईल, तसेच झाले. पहिल्याच सामन्यात मी पाच धावबाद व एक एक गडी बाद केला व मी सामनावीरही ठरले. आणि विश्व विजेतेपद मिळण्यातही संघाला यश मिळाले.

सोलापुरातून अनेक गंगा निर्माण व्हाव्यात
यावेळी पोलीस निरीक्षक संगीता पाटील म्हणाल्या, सोलापूरसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. सोलापुरातून एक गंगा निर्माण झाली आहे. अशा अनेक गंगा सोलापुरातून निर्माण व्हाव्यात. अंध मुलीबरोबरच मुलांनीही आपले आपलेही नाव उज्वल करावे.
—–
उघड्या कारमधून मिरवणूक
विमानतळापासून ते दमाणी अंधशाळेपर्यंत तिची उघड्या कारमधून मिरवणूक काढण्यात आली. रस्त्यावर ठिकठिकाणी तिचे स्वागत करण्यात आले. बाल क्रिकेटपटू व महिलांनीही तिचे रॅली दरम्यान स्वागत केले. बाल क्रिकेटपटू तिची बॅटवर सही घेत होते. दमानीच्या बँड पथकाबरोबर लेझीम पथकही ह्या रॅलीत सहभागी होते. दमाणी अंधशाळेत रॅली आल्यावर शिक्षकांनी तिचे आरती ओवाळून स्वागत केले.
————-
फोटो ओळी
-विमानतळावर स्वागत करताना अंधशाळेची विद्यार्थी व अंधशाळेचे पदाधिकारी.
-उघड्या जीपमधून तिची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी महिलांनी तिचे स्वागत केले.
-बॅटवर सही घेताना बाल क्रिकेटपटू
-रॅलीत सहभागी दमाणी अंधशाळेचे लेझीम व बँड पथक.
—–
























