सांगोला – पूर्वीपेक्षा मानवी सुखाची असंख्य साधने वाढलेली आहेत. आरोग्य सुविधा वाढल्या आहेत. असे असले तरी माणसाचे सरासरी आयुष्यमान कमी होऊ लागले आहे. त्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणी प्यावे, गावांमध्ये फळांची झाडे लावावीत, गाव स्वच्छ ठेवावा, मुलांना शिक्षण व संस्कार द्यावेत, बाहेरचे खाऊ नये, वयस्कर व्यक्तींशी गोड बोलावे, दुसऱ्यांवर जळू नये, या मार्गांचा अवलंब केल्यास मानवाचे आयुष्य पुन्हा शंभर वर्षे होईल असे प्रतिपादन छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पाटोदा येथील आदर्श ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी महूद (ता.सांगोला) येथे बोलताना केले. याप्रसंगी चंद्रशेखर ताटे, बाळासाहेब इनामदार, बाळासाहेब ढाळे, दिलीप नागणे, उत्तम खांडेकर, जितेंद्र बाजारे, मोहन जाधव उपस्थित होते.
भास्कर पेरे-पाटील यांच्या हस्ते महूद अंतर्गत येणाऱ्या केसकरवस्ती येथील महिला व युवकांसाठीच्या रोजगार प्रकल्पाचे उद्घाटन तसेच युवकांच्या पुढाकाराने गावात लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही योजनेचे लोकार्पण व युवकांच्या वतीने उभारण्यात आलेल्या सामाजिक जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते नागेश थोरात, सागर साबळे, नवनाथ सरतापे, विजय पवार, असिफ तांबोळी, दिलीप केसकर, महेंद्र खांडेकर, योगेश थोरात या युवक आणि ग्रामस्थांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
चांगले काम करण्यासाठी पदच पाहिजे असे नाही. गावचा विकास गाडा पुढे नेण्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सर्वच मार्गांचा अवलंब करून लोककल्याणच केले पाहिजे. मात्र कोणतेही काम मी केले व मला त्याचे फळ मिळालेच पाहिजे ही अपेक्षा चुकीची आहे. फळाची अपेक्षा केल्यास दुःख वाट्याला येते.
– भास्करराव पेरे पाटील

















