सोलापूर – सोलापुरातील भाजपमध्ये सध्या “भाजप विरुद्ध भाजप” अशी स्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पक्षात इतर पक्षातील माजी उपमहापौर आणि माजी नगरसेवकांचा प्रवेश झाल्यानंतर माजी आमदारांना भाजपात प्रवेश देण्याची चिन्हे दिसून येताच भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्यांत संतापाची लाट उसळली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी थेट भाजप कार्यालयासमोर आंदोलन छेडत “भ्रष्ट आणि कलंकितांना प्रवेश नको” अशा घोषणा दिल्या. यामुळे पक्षातील अंतर्गत असंतोष उफाळून आला असून, भाजपच्या राजकारणात सध्या मोठा कलह जाणवत आहे.
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या “ऑपरेशन लोटस” मिशन अंतर्गत कार्यक्रमात इतर पक्षातील दोन माजी उपमहापौर आणि पाच माजी नगरसेवक यांनी भाजपा प्रवेश केला. त्यावेळी मुंबईत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे व सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांची अनुपस्थिती लक्षवेधक होती. दोन्ही देशमुख यांना डावलून ऑपरेशन लोटस पत्ते करण्यात आले असल्याची चर्चा आहे.त्यानंतर दोन्ही देशमुख नाराज असल्याची चर्चा रंगली. या घटनेनंतर भाजपातील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाले असून पक्षात दोन स्पष्ट गट तयार झाल्याचे चित्र आहे. एकीकडे गोरे, कोठे, कल्याणशेट्टी तर दुसरीकडे आ. विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख असे गट दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने माजी आमदारांना भाजपात आणण्याची खेळी केली जात आहे. जिल्हा परिषदसह इतर निवडूका यशस्वी करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे.
सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरातील भाजपला पराभवाचा धक्का बसला होता. स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता बाहेरचा उमेदवार लादल्याचा रोष तेव्हाही व्यक्त झाला होता. सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या विजयी झाल्या. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तोच असंतोष पुन्हा पेट घेताना दिसतो आहे. 2017 मध्ये सोलापूर महापालिकेत 49 जागा जिंकून सत्ता मिळवलेल्या भाजपसमोर पुन्हा एकदा “एकजूट की अंतर्गत फुट” असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपा हा बेबनाव दिसून येत आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासमोर आज सर्वात मोठे आव्हान म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा रोष शमवणे आणि ज्येष्ठ विरुद्ध युवा या संघर्षाला तोडगा काढणे हे आहे. जर हा अंतर्गत कलह असाच सुरू राहिला, तर आगामी महापालिका निवडणुकीत भाजप विरोधकांपेक्षा स्वकीयांच्याच शहकाटशहात अडकणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकूणच, सोलापुरात भाजपच्या घरातच राजकीय दिवाळी पेटली. फटाके विरोधकांकडे नाही, तर आपल्या घरातच फुटताना दिसत आहेत. शह – काटशहाच्या भाजपच्या अंतर्गत राजकारणात भाजपा सोलापूर महापालिकेतील सत्ता टिकवत 49 च्या प्लस जाणार की कसे ? याबाबत आता उलट सुलट चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
एकीकडे सन 2017 च्या महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जवळपास कायम ठेवण्यात आली आहे. त्याचा लाभ निश्चितच भाजपाला होणार अशी चर्चा असतानाच दुसरीकडे ऑपरेशन लोटस अंतर्गत इतर पक्षातील माजी नगरसेवक आणि माजी आमदारांचा पक्षप्रवेश हा विषय भाजपामध्ये पेटला आहे. शिस्तबद्ध मानल्या जाणाऱ्या भाजपच्या कार्यालयासमोरच खुद्द भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट धरणे आंदोलन केले. ही ऐतिहासिक घटना आहे. चौफेर यशाचा वारू उधळणाऱ्या भाजपामध्ये आता विसंवादामुळे आणि गटबाजी आणि कुरघोड्याच्या राजकारणात आतून असंतोष दिसून येत आहे.
भाजपात राजकीय ध्रुवीकरण होत आहे. शहरातील शहर उत्तर विधानसभा आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात यापूर्वीच्या महापालिका निवडणुकीत मोठी ताकत लावत 49 नगरसेवक निवडून आणले होते. यामध्ये आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी दोघांमध्ये गटबाजी असतानाही महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविला. स्थित्यंतरे घडत अखेर आज भाजपा नव्या राजकीय वळणावर येऊन ठेपली आहे. सोलापूर शहर मध्य मतदार संघात काँग्रेसचे वर्चस्व होते. या मतदार संघात भाजपचे देवेंद्र कोठे यांनी आमदारकीची बाजी मारली. तत्पूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच शहर मध्य मतदारसघातील तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांनी विजयश्री खेचून आणली. यामुळे आता भाजपाचा एक आमदार वाढला असतानाही भाजपमधील शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे आणि दुसरीकडे माजी मंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख असे उभे दोन गट पडले आहेत. पूर्वी एकमेकांचे जमत नसलेल्या दोन्ही देशमुख यांच्यात आता दोस्तांना निर्माण झाला आहे. प्रभाग 12 मध्ये त्यांनी एकत्र बैठक घेऊन “यहाँ के हम सिकंदर”असा संदेश दिला आहे.
आमदार देवेंद्र कोठे यांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे पाठबळ असल्याचे दिसून येते. अशा या राजकीय स्थित्यंतराच्या परिस्थितीत सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. भाजपची ताकद वाढली असली तरी अंतर्गत गटबाजी आणि कलहामुळे भाजपा महापालिकेतील आपली सत्ता राखणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपातील अंतर्गत असंतोषाचा फायदा खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला होणार ? हे आता येणारा काळच ठरवणार आहे.
दरम्यान, इतर पक्षातील माजी उपमहापौर व माजी नगरसेवकांना भाजपामध्ये पक्षप्रवेश झाला असून त्याच बरोबर माजी आमदारांना भाजप प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचा फटका निश्चितच काँग्रेसला बसणार आहे. दुसरीकडे भाजप पक्षश्रेष्ठीकडून आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांना एकाकी पाडण्याचा मनसुबे असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे भाजपा पक्षश्रेष्ठींचे मनसुबे उधळण्यासाठी कदाचित काँग्रेस व विरोधकांकडून नाराजांना मोठी ताकद आणि शक्ती दिली जाऊ शकते. हे नाकारता येत नाही. भाजप विरुद्ध भाजप या अंतर्गत शह काटशहाच्या राजकारणात चेकमेट कोण होणार ? सोलापुरात भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी, असंतोष हा एका वादळापूर्वीची शांतता असल्याचे दिसून येत आहे.




















