सोलापूर : अण्णप्पा काडादी हायस्कुल एस. एस. सी. १९७४ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी अतिवृष्टी ग्रस्तांना मदतीसाठी संकलित केलेल्या निधीतून सेवा भारतीच्या माध्यमातून वडकबाळ,ता. दक्षिण सोलापूर येथील श्री कट्टेव्वादेवी गोशाळेस टाटा कंपनीचे २१ लोखंडी पत्रे गोशाळेचे अध्यक्ष सुश्री उमा बिराजदार यांचेकडे देण्यात आले.
अलिकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे सीना नदीला आलेल्या महापुरात वडकबाळ येथील सदर गोशाळेचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून अद्याप नुकसान भरपाई मिळाले नसले तरी या गोशाळेच्या पुनर्वसनाचे काम चालू आहे. याच कामात मदतीचा हात देण्यासाठी काडादी हायस्कूल सोलापूरच्या एस.एस.सी. १९७४ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला होता.
याप्रसंगी माजी विद्यार्थी प्रतिनिधी पदम राका,बंडू अनाळकर, अप्पू पाटील, शिरीष गांधी तसेच संघ परिवाराचे राजेंद्र काटवे, सेवा भारतीय सोलापूर जिल्हा शाखेचे पदाधिकारी —- वर्मा, प्रविण तळे, शिरीष गोळवलकर, संगप्पा शरणार्थी आणि गोशाळेचे संस्थाचालक रुद्रप्पा बिराजदार हे उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या माजी विद्यार्थी वर्ग मित्रांनी एकत्र येत अतिवृष्टी ग्रस्तांना सहाय्यासाठी एक लाख पस्तीस हजारांचा निधी संकलित केला होता. त्यातून गेल्या महिन्यात जिल्हा परिषद शाळा, औराद, ता.दक्षिण सोलापूर येथील पहिली ते चौथीच्या १७५ पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दप्तरासह शालेय साहित्य किटचे वाटप करण्यात आले असून त्याकरिता एक लाख रुपये खर्च झाला होता.उर्वरित रकमेतून या गोशाळेला मदत करण्यात आली.
या संघटनेने यापूर्वीही काडादी शाळेच्या विकासासाठी गणित प्रयोगशाळा, ग्रंथालय व क्रीडा साहित्यांची दुरुस्ती, विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदि माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वश्री चंद्रशेखर इंडी, श्रीनिवास भुतडा, संजीवनी साबळे,शैलेश पटेल आदिंनी परिश्रम घेतले.

















