सोलापूर-वैद्यकीय पदवी नसताना डॉक्टर असल्याचा बनाव करून नागरिकांच्या जिवाला धोका पोहोचवल्या प्रकरणी सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात विरेंद्र भालचंद्र जाधव रा.सोलापूर यास मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (कटारिया सो) यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात हकिकत अशी की, दि. 10/8/25 रोजी अविनाश कांबळे व संदीप वाघमारे यांच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने व दि.8/8/25 रोजी युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या तक्रारी अर्जांवर जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे प्राधिकृत प्रतिनिधी व जिल्हा बोगस डॉक्टर शोध पथक म्हणुन प्रशासकीय यंत्रणेसह गट विकास अधिकारी राजाराम भोंग,वैद्यकीय अधीक्षक डॉ. लांडगे, श्री. इनामदार आरोग्य सेवक उत्तर सोलापूर असे तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना सकाळी 10.30 वाजता सोबत घेऊन वदळा येथील महादेव मंदिर येथे गेल्यानंतर असे निदर्शनास आले की, आरोपी विरेंद्र जाधव व कलीम शेख व त्याचे 5 ते 6 सहकारीसह जाहिरात करून शिबीर भरवून रुग्णाची तपासणी करून मेडिसिन देत असल्याचे दिसून आले.
तसेच काही रूग्णांना डॉक्टरांनी दिलेल्या मेडिसिन चा त्रास होत असल्याचा तक्रारी करीत होते. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच अनिल माळी यांना बोलावून घेतले. तद्नंतर आरोपी कडे वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 अंतर्गत कलम 33 व 33अ तसेच बॉम्बे नरसिंग होम अंतर्गत 1999 सुधारित 2021 तसेच महाराष्ट्र वैद्यकीय डिग्री act 1912 अन्वये या प्रमाणपत्र बाबत विचारणा केली असता ते काही एक सांगितले नाही व कोणतेही प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत तसेच त्याच्याकडे आलेले रुग्ण हे आपण दिलेल्या मेडिसिनचा आम्हाला त्रास होत असल्याचे सांगत होते.
त्यावेळी आरोपीं विरेंद्र जाधव व कलीम शेख यांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसाची मुदत द्या असे लेखी अर्ज दिला व त्यांच्या कडून 1 नाडी प्लससाठी पावडर व उपचार पत्र वर लक्ष्मी हेल्थ केअर च्या उपचार पत्र ताब्यात घेतले अशा आशयाची फिर्याद जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे.