मंगळवेढा – मंगळवेढा-आंधळगाव मार्गावरील कचरेवाडी ब्रीज जवळ पंक्चर झालेल्या उभ्या पीकअपला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोराची धडक दिल्याने त्यामध्ये एकजण किरकोळ जखमी होवून वाहनामधील पाच टन डाळींबीचे नुकसान होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील जखमी फिर्यादी रऊफ शेख (रा.मालेगाव जि.नांदेड) हे दि.12 नोव्हेंबर रोजी रात्री 7.30 वाजता बेवनूर ता.जत येथून पिकअपमध्ये अडीच टन डाळींब घेवून सांगोलाहून सोलापूरकडे जात असताना रात्री 9.30 वाजता कचरेवाडी ब्रीजवर आल्यावर फिर्यादीच्या ओळखीचे फिरोज शेख (रा.मोमीनपुरा,नांदेड) यांची महिंद्रा पिकअप गाडी पंक्चर झाल्याने ती रोडच्या बाजूस लाईट पार्कींग करुन पंक्चर काढत असताना फिर्यादी हे मदतीकरता गेले होते.
या दरम्यान सांगोल्याकडून भरधाव वेगात एक ट्रक येवून सदर चालकाने निष्काळजीपणे हयगयीने रस्त्याची परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन उभ्या पिकअपला जोराची धडक देवून फिर्यादीस किरकोळ दुखापत केली,तसेच पिकअपची बॉडी शो तुटून फुटून पाच टन डाळींबाचे नुकसान होण्यास सदर ट्रकचा चाक कारणीभूत ठरला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
कचरेवाडी ब्रीज जवळ अपघात झालेले वाहन व रस्त्यावर पडलेले डाळींब छायाचित्रात दिसत आहे.


















