सोलापूर – महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक येथे आयोजित केलेल्या सोलापूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केले. यावेळी त्यांनी सोलापूर शहराची भौगोलिक परिस्थिती, महापालिकेतील सदस्य संख्या, मागील निवडणुकीमधील सर्व पक्षीय बलाबल आणि पक्षातील पदाधिकारी फ्रंटल सेलचे अध्यक्ष यांची माहिती घेऊन अधिकच्या सूचना केल्या.
आगामी महापालिका निवडणुकीमध्ये सोलापूर महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवू यासाठी पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व इच्छुक पदाधिकारी सोबत घेऊन मोठ्या ताकतीने सोलापूर महापालिकेमध्ये जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निश्चय जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी बैठकीत व्यक्त केला. यावेळी नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा योग्य मेळ घालून सोलापूर महापालिकेची निवडणूक लढविण्यासंदर्भात चर्चा होऊन बैठक संपन्न झाली.
या बैठकीसाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव ,प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, नगरसेवक तोफिक शेख गणेश पुजारी, प्रदेश सचिव इरफान शेख आदींची उपस्थिती होती.