टेंभुर्णी – स्व. लोकनेते कृष्णात बोबडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते स्व. कृष्णात बोबडे चषक टेंभुर्णी या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२५ चा समारोप उत्साहात पार पडला. या स्पर्धेत तुळजापूरच्या शौर्य इलेव्हन संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावून चषकावर आपले नाव कोरले.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन व भाजपा नेते रणजितसिंह (भैय्यासाहेब) बबनराव शिंदे व भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांच्या शुभहस्ते विजेत्या व मानकरी संघांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रथम विजेत्या शौर्य इलेव्हन तुळजापूर संघाला आकर्षक ट्रॉफीसह रोख १,२३,३३३ रुपये प्रदान करण्यात आले.
स्पर्धेत मॉर्निंग क्रिकेट क्लब, टेंभुर्णी या संघाने द्वितीय क्रमांक पटकावत ट्रॉफी व रोख ६१,३३३ रुपये मिळविले. तर यंगर्स बारामती क्रिकेट संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला असून त्यांना ट्रॉफी व रोख ३१,३३३ रुपये देण्यात आले. चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक निमगाव मगर संघास देण्यात आले असून त्यांना ट्रॉफीसह रोख २१,३३३ रुपये प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेत विविध सामन्यांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही विशेष गौरव करण्यात आला. सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आदी खेळाडूंना ट्रॉफी व सायकल देऊन सन्मानित करण्यात आले, यामुळे खेळाडूंमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या वेळी टेंभुर्णीच्या सरपंच सुरजाताई बोबडे, उपसरपंच राजश्रीताई नेवसे, स्पर्धेचे आयोजक गौतम कांबळे ग्रामपंचायत सदस्य, शहाजी गायकवाड, संदीप देशमुख, रवी कुनाळे यांच्यासह टेंभुर्णी व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ॲड. रुपेश बोबडे, सतीश नेवसे, रामचंद्र टकले, नागनाथ वाघे, राजाभाऊ थोरात, बाळासाहेब ढगे, सोमनाथ ताबे, सचिन होदाडे, तुकाराम डोके, दशरथ देशमुख, अमोल धुमाळ,जयवंत पोळ, नामदेव महाराज धोत्रे, तानाजी सलगर, अमोल देवकर, युवा नेते तानाजी गाडे, बाबासाहेब देशमुख, अनिल पाटील, डी. के. देशमुख सर, बाळासाहेब कोठारी, नागेश बोबडे (काका), दादासाहेब कोल्हे, पंडित देशमुख गुरुजी, अतुल देशमुख, मोहण ननावरे, माजी ग्रामपंचायत सदस्य दमन दादा सपाटे आदींचा समावेश होता.स्व. कृष्णात (दादा) बोबडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळाले असून, युवकांमध्ये क्रीडासंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी ही स्पर्धा प्रेरणादायी ठरल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन पाटील यांनी केले
























