माहूर / नांदेड – चिमटा धरण अर्थात निम्न पैनगंगा प्रकल्प विदर्भ- मराठवाडा धरण विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १५ वाहनांच्या ताफ्यासह जवळपास तब्बल २०० शेतकऱ्यांनी आज मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे त्यांच्या राहत्या घरी दुपारी १२ वाजता भेट घेतली.
ही भेट माहूर तालुक्याचे सर्वसामान्यांचे धडाकेबाज युवा नेतृत्व त्रिशुल पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीने घडवून आली.
तब्बल दोन तास निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या प्रत्येक बाजूवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी निम्न पैनगंगा प्रकल्पाची प्रत्येक बारीकसारीक बाजू समजून घेतली.त्यानंतर एक ॲक्टिव्ह आंदोलनकर्ते म्हणून ख्यातनाम असलेल्या जरांगे पाटील यांनी लगेच ॲक्शन मोडवर येत जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांना दूरध्वनीवरून संपर्क करून त्यांना निम्न पैनगंगा प्रकल्प ऊर्फ चिमटा धरण याबाबत लोकांचा विरोध असल्याचे कळविले.तसेच महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आपण जलसंपदा मंत्री ना.गिरिश महाजन व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत धरण विरोधी संघर्ष समितीची बैठक लावून देऊ, असे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी धरणं विरोधी संघर्ष समितीचे मुबारक तंवर, प्रल्हादराव गावंडे सर, बंडू नाईक, बंटी पाटील जोमदे, उत्तमराव भेंडे, गजानन डाखोरे, भगवतीप्रसाद तितरे
यांच्यासह जवळपास दोनशे प्रकल्पग्रस्त धरण विरोधक उपस्थित होते.

























