कौतम चौकात दुचाकी मॅकेनिक म्हणून काम करणाऱ्या बालाजी नागनाथसा मलजी याने दारूच्या व्यसनासाठी सोलापूर शहरातून तीन तर पुणे, सांगलीतून प्रत्येकी एक अशा पाच दुचाकी चोरल्या. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला चोरीच्या दुचाकी विकायला आल्यावर सापळा रचून पकडले.
दुचाकी दुरुस्ती करण्याचा व्यवसाय असतानाही संशयित आरोपी बालाजी मलजी याला दुचाकी चोरीची सवय लागली. त्याने सोलापूर शहरातील फौजदार चावडी, विजापूर नाका व जोडभावी पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी दुचाकी चोरली होती.
त्यानंतर त्याने सांगली जिल्ह्यातील उमदी पोलिस ठाणे व पुण्यातील हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून देखील प्रत्येकी एक दुचाकी चोरली होती. नवीनच चोरटा असल्याने पोलिसांनाही त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता.
पण, अखेर खबऱ्याने पोलिसांना माहिती दिली आणि बालाजी मलजी अलगद पोलिसांच्या सापळ्यात अडकला. अक्कलकोट रोडवरील लक्ष्मी नगराजवळील मोकळ्या मैदानात चोरीची दुचाकी विकायला बालाजी आला होता. खबऱ्याने ही माहिती पोलिसांना दिली होती.