माहूर – तालुक्यातील शेख फरीद वझरा येथील दर्गाहचे दर्शन करून सुप्रसिद्ध धबधब्याचे फोटो काढत असताना तोल जाऊन धबधब्याच्या खालील डोहात पडल्याने किनवट येथील एका ३२ वर्षीय तरुणाचा डोहातील खोल पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना दि.०३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान घडली. या दुःखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील राहिवासी असलेला शेख इर्शाद शेख रफिक वय ३२ हा युवक मित्रांसोबत शेख फरीद बाबा वझरा येथील दर्गाह येथे दर्शनासाठी गेला होता. त्या ठिकाणी असलेल्या धबधब्यावर फोटो काढत असताना त्याचा तोल जाऊन तो धबधब्याच्या खालील डोहाततील पाण्यात पडला. पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे तो बुडाला. आजूबाजूच्या लोकांनी व मित्रांनी त्याला पाण्याबाहेर काढले परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.
शेख फरीद बाबा दर्गाह दगडात कोरलेले असून पहाडाचे पाणी या दर्गाह वरून पडत असल्याने येथे निसर्गनिर्मित सुंदर असा धबधबा निर्माण झाला असून येथे दर्शन आणि पर्यटनासाठी लाखोच्या संख्येने भाविक पर्यटक येतात. अनेकवेळा दुर्घटना घडून भाविकांचा येथे बुडून मृत्यू झालेला आहे. परंतु शासनाने याकडे सतत दुर्लक्ष केल्याने आणखी जीव जाण्याआधी येथे येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उचित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत असून घटनेची माहिती मिळाल्याने पोलिस घटनास्थळावर पोहोचले होते.


















