लातूर / औसा – मराठवाड्यातील पहिला आणि लातूर धाराशिव जिल्ह्यातील सर्वाधिक सभासद असलेला व १५ वर्षापासून बंद पडलेला, बँकेचा बोजा उतरविण्यासाठी विक्री किंवा भाडेतत्वाच्या उंबरठ्यालर अडकलेला तालुक्यातील किल्लारी येथील श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना नव्या रूपात, नव्या ऊर्जेसह आणि दुप्पट क्षमतेने गळीत हंगामासाठी सज्ज झाला असून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवार दि. १० रोजी सकाळी ११.३० वा. या वर्षीच्या गळित हंत हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
स
हकार व साखर उद्योग क्षेत्रातील नामांकित उद्योजक ज्येष्ठ मार्गदर्शक बी. बी. ठोंबरे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ शिवाजीराव काळगे, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, माजीमंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, माजीमंत्री तथा आमदार संजय बनसोडे, माजीमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार प्रवीण स्वामी, आमदार रमेश कराड, डॉ. संजय कोलते (घा. प्र. से.) तसेच दिपक तावरे (भा. प्र. से.) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्यास कारखान्याचे सर्व सन्माननीय सभासद, विगर सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, व्यापारी, ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदार, हितचिंतक आणि शेतकरी बंधू यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे.किल्लारी कारखान्याने गेल्या काही वर्षांत अक्षरशः नवजीवन प्राप्त केले आहे. श्री निळकंठेश्वराच्या आशिर्वादाने आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली कारखाना अत्याधुनिक मशिनरीने सुसज्ज झाला असून पूर्वीपेक्षा दुप्पट उत्पादन क्षमतेने गाळपासाठी सज्ज आहे. एकेकाळी बंद होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या कारखान्याने आज पुन्हा नव्या उत्साहाने उभारी घेतली आहे.
या पुनरुज्जीवनाच्या प्रवासामुळे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. गळीत हंगामाच्या प्रारंभी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, हजारो सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कामगार आणि नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना, किल्लारीचे सर्व सभासद आणि कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे सस्नेह आमंत्रण देण्यात आले आहे. बऱ्याच वर्षांच्या संघर्षानंतर आज किल्लारी पुन्हा नव्या उत्साहाने गोडवा गाळायला सज्ज झाला आहे हे केवळ कारखान्याचे पुनरुज्जीवन नाही, तर शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांचे नवजीवन आहे.असे मत आ. अभिमन्यू पवार यांनी यावेळी व्यक्त केले.




















